गोपीनाथ मुंडेसह ओबीसी समाजावर भाजपकडून अन्याय
धनंजय मुंडे यांचा हल्लाबोल
जालना : ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असो की सत्तेत वाटा देण्याचा मुद्दा असो, स्व. गोपीनाथराव मुंडे असो की एकनाथ खडसे यांचा विषय असो , भाजपने नेहमीच ओबीसी समाजावर अन्याय केला असा घणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर केला. मेहनत ओबीसींनी करायची, ओबीसींकडून मते मिळवायची आणि त्यांच्यावरच अन्याय करायचा हीच भाजपची कूटनीती आहे अशी टीकाही त्यांनी केली.
माजी मंत्री, आमदार राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त आज जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथे ओबीसी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास त्यांनी संबोधित केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच ओबीसी समाजाला न्याय देऊ शकते असे उदगार धनंजय मुंडे यांनी काढले. आपल्या भाषणात बोलताना मुंडे म्हणाले की ओबीसी महामंडळ फक्त नावालाच आहे. या सरकारने ओबीसी समाजासाठी नवीन काहीच केले नाही. साधा नवीन ओबीसी मंत्रीही सरकारतर्फे देण्यात आला नाही. या देशात सर्वप्रथम मंडळ आयोगाची अंमलबजावणी शरद पवार यांनी आपल्या राज्यात केली अशी आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली. पवार यांनी १५ वर्षातील सत्तेच्या काळात छगन भुजबळ, सुनील तटकरे, गणेश नाईक , जयदत्त क्षीरसागर आदींच्या माध्यमातून ओबीसी समाजाला संधी दिली असेही ते म्हणाले. भाजपमधील ओबीसी नेते आज कुठेच दिसत नाही. जो न्याय कारवाई करताना खडसे यांना दिला त्या न्यायाने प्रकाश मेहता यांच्यावर कारवाई का केली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षण शांत करण्यासाठी शिवरायांचे नाव घेऊन शिवस्मारकाचे फक्त भूमिपूजन केले तर विद्यापीठाला नाव देऊन धनगर आरक्षणाच्या विषयाला बगल दिलीअसा आरोपही मुंडे यांनी केला. पवार यांनी सर्व जातींना मानाचे स्थान दिले. त्यामुळेच राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली त्यांची प्रगती होऊ शकली असे मत ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे यांनी केले. देशाच्या पंतप्रधानांनी ओबीसींना फक्त प्रलोभने दिली. भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष झाले आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या प्रलंबित आहे. ओबीसी समाजाची प्रगती रोखली जाते आहे. त्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या नेत्यांची चौकशी केली जाते. बहुजन समाज संपवायचा मनसुबा असल्यास आम्ही भिक घालणार नाही असे प्रतिपादन बाळबुधे यांनी केले. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले तरच ओबीसींचे उत्थान होईल असे उदगार त्यांनी काढले.