अल्टामाऊंट रस्त्याला स्वातंत्र्य सैनिक मथुरादास मेहता यांचे नाव
मुंबई : जापनिज कौन्सुलेट समोरील टी जंक्शन रस्त्याला थोर स्वातंत्र्य सैनिक मथुरादास मेहता यांचे नांव देण्यात आले आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज मोठ्या थाटात हा नामकरण सोहळा पार पडला.
पेडर रोडवर असलेला टी जक्शंन रस्ता अल्टामाऊंट नावाने ओळखला जात होता. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज या रस्त्यावरील चौकाला मथुरादास मेहता यांचे नाव देण्यात आले. त्यानंतर राॅयलस्टोन निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास आ. मंगलप्रभात लोढा, नगरसेविका सरिता पाटील, ऑल इंडिया बिझीनेस कौन्सिलचे अध्यक्ष आर. व्ही. शहा, लालूभाई मेहता उपस्थित होते.
यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी मथुरादास मेहता यांच्या कार्याचा गौरव केला. स्वातंत्र्य लढ्यात मेहता यांचे योगदान मोठे होते. त्यांच्या अथक परिश्रमांतून देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी अजूनही गरिबी, भ्रष्टाचार आणि इतर काही गोष्टी पासून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले नाही. सर्वांनी एकत्रितपणे यासाठी लढा देऊन देशाला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले. आ. लोढा यांनी आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे अठरा पगड जाती जमातीचे नेते होते, त्यांचा वारसा पंकजाताई समर्थपणे पुढे घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी मेहता परिवाराच्या वतीने पंकजा मुंडे यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास उद्योग क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होते.