आरे कर्मचारी आणि स्टाँल धारकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्र्यासोबत बैठक
राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या मेळाव्यात आ. आशिष शेलार यांची घोषणा
मुंबई : मुंबईसह राज्यातील शासकीय आरे दुग्धशाळेला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी आरे कर्मचारी आणि स्टाँल धारकांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी येत्या महिन्याभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या पदाधिका-यांची बैठक आयोजित करणार असल्याची घोषणा मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी केली. राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने आरे कर्मचारी आणि स्टाँल धारकांचा भव्य मेळावा येथे पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भोसले होते.
वरळी येथील आरे दुग्धशाळेत भाजपप्रणीत राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने आयोजित केलेला आरे कर्मचारी आणि स्टाँल चालकांचा भव्य मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या नामफलकाचे अनावरण मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांचे हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भोसले होते. या भव्य मेळाव्याला मुंबई प्रदेशाध्यक्ष रामराजे भोसले,आघाडीचे पदाधिकारी,आरे दुग्धशाळेताल कामगार व त्यांचे कुटूंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भोसले म्हणाले की,आरे डेरीची मुंबईसह राज्यात शेकडो एकर जमीन विविध जिल्ह्यांच्या शहरात मोक्याच्या ठिकाणी असून,नफ्यात चालणारी हि संस्था तत्कालीन सरकारच्या अनास्थेमुळे काही अधिका-यांना हाताशी धरून जाणीवपूर्वक डबघाईला आणली आहे. राज्यात आता आपले सरकार आल्याने कर्मचा-यांचे आणि स्टाँल धारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी भोसले यांनी यावेळी केली.सभेपूर्वी भाजपप्रणीत राष्ट्रीय आघाडीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भोसले, मुंबई अध्यक्ष रामराजे भोसले व पदाधिका-यांच्या वतीने आमदार अॅड. शेलार यांचा शाल,श्रीफळ, शिंदेशाही पगडी व चांदीची तलवार देवून सत्कार करण्यात आला.
मेळाव्याला संबोधित करताना आ. आशिष शेलार यांनी आरे या ब्रॅंन्डच्या व खपाच्या आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांचे दुध संघ चांगले चालावेत व त्यांच्या ब्रॅंन्डचा खप मुंबईसह राज्यात पसरावा यासाठी त्या-त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी प्रचंड नफ्यात असलेल्या शासकीय दुग्ध योजनेला भंगारात काढले,असा आरोपही शेलार यांनी केला. वरळी डेरीचा माझा फारसा अभ्यास नाही तरी आपण विधानसभेत त्या-त्या वेळी विविध मार्गांनी यासंदर्भात चर्चा घडवून आणल्या आहेत.त्यामुळे आरे डेरी पुन्हा पुर्ववत सुरू करण्यासाठी मी स्वता दुग्धविकास आयुक्तांशी चर्चा करेन.राहता राहिला या डेरीच्या वसाहतीतील कामगारांच्या हक्काच्या घराचा,कामगारांच्या मुलांना डेरीत अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवून देण्याचा,कामगारांच्या बदल्यांचा या प्रश्नावर एका महिन्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून त्यातून सकारात्मकच तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.मी स्वता वकील असल्याने तुमची वकिली तीही फुकटात मुख्यमंत्र्यांसमोर करेन. पण आरे बंद पडू देणार नाही व कामगारांना वा-यावर सोडणार नाही अशी ग्वाहीही शेलार यांनी दिली.खाजगीकरणाला आमचा विरोध नाही पण विकास हा मानवतावादी असायला हवा,तो भकास करण्यासाठी नसावा याच मताचे पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस असल्याचे सडेतोड प्रतिपादनही त्यांनी केले.