नाणार रिफायनरीच्या वादात मनसेची उडी !
रत्नागिरी : नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात येथिल स्थानिक जनतेने शेवटपर्यत विरोधात उभे राहावे. मी स्वतः जनतेसोबत असून, स्थानिकांनी एकत्र राहून या प्रकल्पाला विरोध करावा असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले. प्रथम तुम्ही आपल्या जमिनी विकण्याचे बंद करा. याबाबत मुख्यमंत्र्यांना काय सांगायचे आहे ते मी त्यांच्या कानात सांगेन असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाणार येथिल रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला असतानाच आता या प्रकल्पाच्या विरोध मनसेने दंड थोपटले आहेत. या प्रकल्पाबाबत प्रथमच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाणार परिसराला भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधून येथिल परिस्थिती जाणून घेतली. म्हणणे ऐकून घेतले. येथील ग्रामस्थानी आपल्या विविध समस्या राज ठाकरे यांच्याकडे मांडल्या. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी यापूर्वी येथे येवून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर येथिल ग्रामस्थांचे गा-हाणे त्यांनी राज ठाकरे यांच्या कानी घातल्यानंतर आज राज ठाकरे यांनी नाणार परिसराला भेट दिली. तुम्ही या प्रकल्पाच्या विरोधात शेवट पर्यंत लढा द्या, मी तुमच्या सोबत आहे. या प्रकल्पाला स्थानिकांनी एकत्र येवून विरोध करावा त्याच बरोबर येथिल जनतेने प्रथम आपल्या जमिनी विकणे बंद करावे असे आवाहन राज ठाकरे यांनी ग्रामस्थांना केले. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना याबाबतची वस्तुस्थिती त्यांना सांगणार आहे.हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी करणार असल्याचे आश्वासन त्यांनी येथिल जनतेला यावेळी दिले.
कोकणसारख्या निसर्गरम्य परिसरात पर्यावरणपूरक उद्योग आले पाहिजेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. शिवसेनेपाठोपाठ आता मनसेनेही या प्रकल्पाला विरोध दर्शविल्याने सरकारच्या समोरील अडचणीत वाढ होवून या प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.