राज्यात गेल्या तीन वर्षात ५० लाख शौचालयांची उभारणी

राज्यात गेल्या तीन वर्षात ५० लाख शौचालयांची उभारणी

नवी दिल्ली : स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण) अंतर्गत देशात गेल्या तीन वर्षात ५ कोटीहून अधिक घरगुती शौचालये बांधण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गेल्या तीन वर्षात ५० लाख ८ हजार ६०१ शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे, तर राज्यातील १६ जिल्हे व ३४ हजार गावे हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने देशाच्या ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण) अंतर्गत झालेल्या कामाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.२ ऑक्टोबर २०१४ रोजी देशातल्या ग्रामीण भागात ३८.७० टक्के घरगुती शौचालये होती, १४ जानेवारी २०१८ अखेर ही टक्केवारी ७६.२६ टक्क्यांवर पोहोचली आहे. आजअखेर देशात ५ कोटी ९४ लाख ४५ हजार शौचालयांची निर्मिती झाली आहे, तर देशातील ३ लाख ९ हजार १६१ गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. देशातील ३०३ जिल्हे हागणदारीमुक्त जिल्हे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांचा समावेश आहे.

२०१५-१६ या वर्षात ६ हजार ५३ गावे राज्यात हागणदारीमुक्त जाहीर करण्यात आली होती. ही संख्या २०१६-१७ मध्ये २१ हजार ७०२ इतकी झाली. आज अखेर महाराष्ट्रातील ३४ हजार १५७ गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. राज्यातील गोंदिया, नागपूर, वर्धा, भंडारा, जालना, बीड, अहमदनगर, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे,पालघर व रायगड ही जिल्हे हागणदारीमुक्त झाली आहेत.

ग्रामीण महाराष्ट्रात घरगुती शौचालय निर्मितीमध्ये उल्लेखनीय कार्य झाले आहे. राज्यातल्या ३० जिल्ह्यातील ग्रामीण भागात १०० टक्के शौचालय उभारणी झाली आहे. नंदुरबार, जळगाव, वाशीम, यवतमाळ, बुलडाणा व गडचिरोली या सहा जिल्ह्यात घरगुती शौचालय उभारणीचे काम ८० ते ९० टक्के पर्यंत पूर्ण झाले आहे. लवकरच या जिल्ह्यातील घरगुती शौचालय उभारणीचे काम पूर्ण होणार आहे.

गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात ५० लाख ८ हजार ६०१ घरगुती शौचालये बांधण्यात आली आहेत. २०१४- १५ या वर्षात राज्यात ४ लाख ३२ हजार ३४ शौचालये बांधण्यात आली.२०१५-१६ या वर्षांत ८ लाख ८२ हजार ८८, सन २०१६-१७या वर्षात १९ लाख १७ हजार १९१ तर २०१७-१८ या वर्षात १७ लाख ७८ हजार २८८ शौचालये बांधण्यात आली आहेत.सन २०१५- १६ साली महाराष्ट्रातील १४.९४ टक्के गावे हागणदारीमुक्त होती, आता ८४.३० टक्के गावे हागणदारीमुक्त झाली आहेत.

Previous articleआई भवानीला साकडं घालून करणार हल्लाबोल यात्रेची सुरुवात
Next articleधनंजय मुंडे यांनी वाचवले अपघातग्रस्त मोटार सायकल चालकाचे प्राण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here