मुंबईत उद्यापासून सरस महालक्ष्मी प्रदर्शन
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती
मुंबई : राज्यातील बचतगटांच्या उत्पादनांना मुंबईत हक्काची बाजारपेठ आणि प्रदर्शनाची संधी उपलब्ध करुन देणारे महालक्ष्मी सरस प्रदर्शन उद्यापासून सुरु होत असल्याची माहिती ग्रामविकास आणि महिला – बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. हे प्रदर्शन एमएमआरडीए मैदान, प्लॉट क्रमांक १९ ते २२, वांद्रे – कुर्ला संकुल, मुंबई येथे १७ जानेवारी ते २९ जानेवारी २०१८ या कालावधीत नागरीकांसाठी सकाळी १० ते रात्री १० वाजता या कालावाधीत खुले राहणार असून प्रवेश विनामूल्य असेल. या प्रदर्शनाचे उद्घाटन व राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराचे वितरण राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्या बुधवारी होणार आहे, असे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत दरवर्षी या प्रदर्शन, विक्री आणि राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेल्या वस्तु, उत्पादने, साहित्य, नाविन्यपुर्ण कला व खाद्यपदार्थ सहजपणे शहरी नागरीकांपर्यत पोहचविण्यात येतात. त्यांना एक चांगली हक्काची शहरी बाजारपेठ अनुभवण्याची संधी यामाध्यमातून मिळते. तसेच यामाध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल स्वयंसहाय्यता गट करत असतात. महाराष्ट्रातील स्वयंसहाय्यता गटाबरोबरच जवळपास २८ राज्यांमधून विविध उत्पादने, कला घेऊन स्वयंसहाय्यता गट या प्रदर्शनीत सहभागी होणार आहेत. एकूण ५११ स्टॉल उपलब्ध असणार असून त्यापैकी ७० स्टॉल विविध खाद्यपदार्थांचे असणार आहेत. यावर्षी स्वयंसहाय्यता गटांना स्टॉल वाटप ऑनलाईन पध्दतीने करण्यात आलेले आहे, असे त्यांनी सांगितले.भारतातील विविध संस्कृती व स्वादिष्ट भोजन येथे उपलब्ध होते. यामध्ये ग्रामीण महिलांनी व कारागीरांनी तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तु, अस्सल ग्रामीण भागातील खाद्यपदार्थ या प्रदर्शनात उपलब्ध होणार आहेत. दररोज सायंकाळी ग्रामीण भागातील विविध लोककलांचे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
महालक्ष्मी सरसमध्ये सहभागी होणाऱ्या स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनांची जास्तीत जास्त विक्री व्हावी यासाठी मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे व नवी मुंबई तसेच राज्यातील इतर भागातील नागरीकांनी जास्तीत- जास्त संख्येने या प्रदर्शनीस भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.राज्य शासनाने बचतगटांना शुन्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याची महत्वाकांक्षी योजना सुरु केली असून राज्यात आतापर्यंत ४ हजार ६६२ बचतगटांना याचा लाभ झाला आहे, अशी माहितीही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली. या योजनेंतर्गत आतापर्यंत १ कोटी ५२ लाख रुपयांचे व्याज अनुदान वितरीत करण्यात आले आहे. यापुढील काळातही या योजनेला चांगली गती दिली जाईल, असे त्या म्हणाल्या.
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, राज्य शासनामार्फत ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असून याअंतर्गत आतापर्यत २ लाख स्वयंसहाय्यता गटांची स्थापना करण्यात आली आहे. हे स्वयंसहाय्यता गट नियमित दशसुत्रीचे पालन करतात. ग्रामपंचायतस्तरावर ५ हजार १७७ ग्रामसंघ स्थापन करण्यात आलेले आहे. अभियानामार्फत स्वयंसहाय्यता गटांना १७८ कोटी रुपयांचा समुदाय गुंतवणूक निधी तसेच ३ हजार ७२० कोटी रुपयांचे बॅकेमार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. या अर्थसहाय्याच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता गटांनी वेगवेगळया उपजीविकेच्या साधनांची, व्यवसायांची निर्मिती केलेली आहे, असे त्यांनी सांगितले.