राज्यातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठीअधिक गुंतवणुकीस परवानगी मिळावी

राज्यातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठीअधिक गुंतवणुकीस परवानगी मिळावी

मुख्यमंत्री

मुंबई : राज्यांना पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी अधिक भांडवली गुंतवणूक उभारण्याची परवानगी मिळण्यासह राज्याच्या हिश्श्याची रक्कम उभारताना नाबार्डकडून कमी व्याजदराने वित्त पुरवठा उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली. तसेच मुंबईत नियोजित जागतिक गुंतवणूक परिषदेस उपस्थित राहण्याचे निमंत्रणही मुख्यमंत्र्यांनी जेटली यांना यावेळी दिले.

महाराष्ट्रातील गुंतवणुकीला चालना देण्याच्या उद्देशाने मुंबईत १८ ते २० फेब्रुवारी २०१८ या कालावधीत आयोजित पहिल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र – कन्व्हर्जन्स २०१८ या जागतिक गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही या परिषदेस उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आज दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

दरम्यान, येत्या केंद्रीय अर्थसंकल्पासंदर्भात राज्याच्यावतीने काही अपेक्षा आणि सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी जेटली यांच्यासमोर मांडल्या. यामध्ये विशेषत: पायाभूत सुविधांची निर्मिती करताना भांडवली गुंतवणूक वाढली पाहिजे, यासाठी महाराष्ट्रासारख्या राज्यांना पायाभूत सुविधांसाठी अधिक भांडवल उभारण्याची परवानगी देण्यात यावी; तसेच कृषी व सिंचन क्षेत्रामध्ये मूलभूत सेवा-सुविधा पुरविण्यासाठी नाबार्डने महाराष्ट्राला आतापर्यंत सुमारे एक हजार कोटी रुपये उपलब्‍ध करुन दिले आहेत. मात्र, यापेक्षा अधिक वित्तपुरवठा नाबार्डने उपलब्ध करुन द्यावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. शेती क्षेत्रासाठी सिंचनासह विविध कामांकरीता केंद्राने यापूर्वी राज्याला वित्त पुरवठा केला असला तरी या विविध कामांमध्ये राज्याच्या हिश्श्याची रक्कम उभारण्यासाठी नाबार्डने कमी दराने कर्ज उपलब्ध करुन द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्याच्या इतर मुद्यांबाबतही मुख्यमंत्र्यांनी जेटली यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

Previous articleज्येष्ठ नागरिकांसाठी वयाची अट ६५ ऐवजी ६० ?
Next articleशेतक-यांना वा-यावर सोडून सरकारने इनोव्हेह कंपनीला १०० कोटी दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here