संविधान बचाव आंदोलनाच्या निमित्ताने विरोधक एकवटले
मुंबई : देशातील सध्याची परिस्थिती पाहता संविधान वाचविण्यासाठी येत्या २६ जानेवारीला मुंबईत सर्वपक्षीय संविधान बचाव रॅली काढण्यात येणार असून, गेट वे ऑफ इंडिया येथे मुक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.यावेळी विद्यार्थ्यांसह विविध राजकिय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
भाजपच्या विविध नेत्यांचे वक्तव्य आणि सर्वोच्च न्यायालयात घडलेली घटना पाहता देशात वेगळे वातावरण तयार झाले आहे. घटनेवरील विश्वासाला तडे जायला लागले आहेत अशी भिती व्यक्त करून या विरोधात आवाज उठविण्याची विनंती विद्यार्थ्यांनी केल्याने येत्या २६ जानेवारीला मंत्रालयाजवळील डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासुन या संविधान बचाव आंदोलनाला सुरूवात होणार असून, गेट वे ऑफ इंडीया जवळ मुक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.या अराजकिय आंदोलनात शरद पवार, शरद यादव,तुषार गांधी, बाबा आढाव, अशोक चव्हाण, फारूक अब्दुल्ला, पृथ्वीराज चव्हाण, अल्पेश ठाकूर, हार्दिक पटेल आदी नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजु शेट्टी यांनी देवून संविधानावर विश्वास असणा-यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेला आ. जितेंद्र आव्हाड आणि आ. कपिल पाटील उपस्थित होते.