लोकसभा आणि विधानसभेमध्ये चुकलात तशी चुक पुन्हा करु नका

लोकसभा आणि विधानसभेमध्ये चुकलात तशी चुक पुन्हा करु नका

अजित पवार

प्रचंड मोटारसायकली रॅलीने राष्ट्रवादीच्या नेत्यांचे स्वागत

बीड ( माजलगाव ) : लोकसभा आणि विधानसभेमध्ये चुकलात तशी चुक पुन्हा करु नका. या सरकारला वठणीवर आणण्यासाठी नव्या उमेदीने कामाला लागा आणि जे अपयश आले आहे ते धुवून काढण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी माजलगावच्या जाहीर सभेमध्ये माजलगाववासियांना केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनातील दुसरी सभा माजलगावच्या तुंबा मैदानावर प्रचंड जनसमुदायासमोर पार पडली. गेवराई येथून निघाल्यानंतर माजलगावच्या हद्दीमध्ये अजित पवार,प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्या ताफ्यासमवेत हजारो तरुणांनी युवा नेते जयसिंग सोळंके यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोटारसायकल रॅली काढली. आज दिवसातील ही दुसरी सभाही प्रचंड प्रतिसादामध्ये पार पडली.

या सभेच्या सुरुवातीला राष्ट्रवादी पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, आमदार विदया चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची भाषणे झाली. ८ लाख कोटीचा कर्जाचा डोंगर उभा करुन तुमचं माझं राज्य कंगाल करण्याचे काम या सरकारने केले आहे. तुमच्या शेतातील सोयाबीन, हरभरा, तुरीला योग्य भाव नाही, दुधाला दर नाही या समस्यांसाठीच राष्ट्रवादीने हे हल्लाबोल आंदोलन केले आहे. या बीड जिल्हयात साडेतीन वर्षीत एक तरी नवीन प्रकल्प आला का ? काय करतात इथले मंत्री, काय करतात मुख्यमंत्री, विदर्भ जसा तुमचा तसा मराठवाडा तुमचा नाही का ? मराठवाडयाला निधी देत नाही. काय करतात मराठवाडयातील मंत्री, सरकारला त्यांना जाब विचारता येत नाही असा संतप्त सवाल करत अजित पवार यांनी मराठवाडयावर अन्याय होवू देणार नाही असे स्पष्ट केले.अहो जनतेबद्दल आस्था असावी लागते. ती आस्था इथल्या पालकमंत्र्याला आहे का, राज्याचे बालविकास खातं त्यांच्याकडे आहे. परंतु त्यांच्या कारकीर्दीमध्ये ६७ हजार लहान बालकांचा पोषण आहाराअभावी मृत्यु झाला हा यांचा विकास असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

चार दिवस सासूचे असतात तसे सुनेचेही असतात. आम्ही सत्तेत असताना कुणालाही त्रास दिला नाही. उलट आम्ही विरोधकांनाही जवळ करत काम केले. परंतु आत्ताचे सरकार विरोधकांना संपवण्यासाठी काम करत आहे. हे सत्ताधाऱ्यांमधील काहींना सोडून विरोधकांना धरत आहेत. हे चालणार नाही. करायची कारवाई तर दोघांवरही करा असे सांगतानाच अजित पवार यांनी थांबा आमची सत्ता येवू दया, त्रास कुणाकुणाला देत होतात ते…सत्ता आल्यावर बघतोच असा इशारा अजित पवार यांनी सरकारमधील चुकीच्या पध्दतीने धोरण राबवणाऱ्या लोकांना दिला.

सभेमध्ये माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी इथल्या स्थानिक आमदाराच्या कारभारावर टिकेची झोड उठवली. साडेतीन वर्षात इथल्या आमदाराने लोकाभिमुख काम केलेले नाही की कोणता मोठा प्रकल्पही आणलेला नाही अशी टिका केली.

Previous articleप्रत्येक विभागात ५०० मे.वॉ सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण करणार
Next articleमागासवर्गीय संस्थांना मंजुरी न दिल्यास प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडविणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here