पाण्याचे दर वाढवल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता

पाण्याचे दर वाढवल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता

अजित पवारांनी व्यक्त केली भीती

नांदेड : राज्यातील जनता हैराण असतानाच आज सरकारने शेतीच्या पाण्याचे दर १७ ते ५० टक्के वाढ केली आहे. शेतकऱ्यांसमोर पाण्याचा यक्ष प्रश्न असून शेती पंपाचे वीज कनेक्शन कट करण्याची मोहिम सुरु आहे. हे थांबवा अन्यथा राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो अशी भीती विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी नांदेडच्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस असून, नांदेडच्या शासकीय विश्रामगृहामध्ये विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,आमदार जयदेव गायकवाड,आमदार सतिष चव्हाण, जेष्ठ नेते कमलकिशोर कदम , डॉ सुनील कदम, विक्रम देशमुख, फिरोज लाला उपस्थित होते.

भाजपचे केंद्रीयमंत्री हेगडे यांनी संविधान बदलण्याबाबत केलेल्या गंभीर वक्तव्यानंतर संविधानाबाबत जोरदार जनजागृती केली जात आहे. देशातील आणि राज्यातील सर्व पक्षाचे नेते संविधान बचावासाठी प्रजासत्ताक दिनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहेत. ओव्हल मैदान ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत ही बचाव रॅली काढली जाणार आहे तिथे दिवसभर हे आंदोलन केले जाणार आहे. मात्र त्याचवेळी भाजप तिरंगा रॅली काढत आहे. संविधान बचावासाठी देशातील नेते एकत्र येत आहेत आणि भाजप तिरंगा रॅली काढत आहेत. तिरंगा रॅलीही महत्वाची आहे परंतु संविधान रॅली काढायचे ठरवल्यावर ही तिरंगा रॅली भाजप का काढत आहे. तिरंग्याचा प्रत्येकाला अभिमान आहे. परंतु यांचा हा खेळ सुरु आहे असा आरोप करतानाच यांना राज्यात जातीय सलोखा नकोय का असा संतप्त सवालही पवार यांनी सरकारला केला.छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्मारक उभारण्याची घोषणा करायची आणि त्याचे कामही पूर्ण करायचे नाही. या महापुरुषांचा आधार घ्यायचा आणि लोकांच्या भावनेशी खेळायचे ही दुटप्पी भूमिका सुरु आहे. हे तुम्हा-आम्हाला मारक आहे. त्याविरुध्द राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल आंदोलन पुकारले असल्याचे पवार यांनी सांगितले.

दरम्यान येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या सर्व घटनांचा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सरकारला जाब विचारल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशाराही पवार यांनी दिला.

Previous articleउद्योगमंत्री सुभाष देसाईंचा चौकशी अहवाल १५ दिवसात सरकारला सादर करणार
Next articleमहाराष्ट्राच्या जनतेचा मेक ओव्हर नीट करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here