भुजबळ समर्थक” अर्थसंकल्पीय अधिवेशनावर धडकणार

“भुजबळ समर्थक” अर्थसंकल्पीय अधिवेशनावर धडकणार

सर्वपक्षीय भुजबळ समर्थकांच्या बैठकीत निर्णय

नाशिक :  माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर सूड बुद्धिने  करवाई होत असल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय ‘भुजबळ समर्थक’ एकटवले असून, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वपक्षीय भुजबळ समर्थक मुंबईत धडकणार असल्याचा निर्णय आज भुजबळ समर्थक समन्वय समितीकडून घेण्यात आला. या बैठकीत नाशिक जिल्ह्याबरोबरच राज्यातील सर्व भुजबळ समर्थक आमदार अधिवेशन काळात विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करणार असल्याचा निर्धार बैठकीत सर्वपक्षीय आमदारांनी केला.

भुजबळ समर्थक समन्वय समितीच्या बैठकीत गाव पातळीपासून देशपातळीपर्यत ‘भुजबळ समर्थक जोडो अभियान’ राबविण्यात येणार असून, भुजबळ समर्थक समन्वय समित्या गठीत गेल्या जाणार असल्याची घोषणा नाशिक जिल्हा भुजबळ समर्थक समन्वय समितीकडून यावेळी करण्यात आली. यावेळी बोलतांना भाजपचे आ.अपूर्व हिरे म्हणाले की, छगन भुजबळ हे देशपातळीवरील नेते असून त्यांच्या समर्थनार्थ सर्वपक्षभेद विसरून सर्वपक्षीय नेते एकत्र आले असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिले असून त्यांची देशातील सर्वसामान्य नागरिकांना आवश्यकता आहे. त्यांच्यावर होत असलेल्या कारवाई मध्ये कलम ४५ रद्द झाले असले तरी अद्यापही त्यांना जामीन मिळालेला नाही त्यामुळे आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात पायऱ्यांवर आंदोलन करण्यात येईल. सभागृहात चर्चा घडवून सरकारचे लक्ष वेधले जाईल आणि विधिमंडळासह विधिमंडळाबाहेर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असे त्यांनी सांगीतले.

यावेळी बोलतांना शिवसेनेचे आमदार अनिल कदम म्हणाले की, भुजबळ समर्थक समन्वय समिती जो निर्णय घेईल त्याला माझा पूर्णपणे पाठींबा असून भुजबळ समर्थक समन्वय समितीमध्ये आपणही सहभागी होऊन सक्रीय सहभाग घेणार असल्याचे सांगितले. तसेच म्हणाले की, तालुका पाळीपासून देशपातळीपर्यंत भुजबळ समर्थकांचे संघटन करणे आवश्यक असून तालुका गावपातळी पासून बैठका घ्यावा असे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी बोलतांना जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे म्हणाले की, मी भाजप पक्षातला असलो तरी एक भुजबळ समर्थक असल्याचे त्यांनी नमूद करून भुजबळांच्या समर्थनार्थ होणाऱ्या आंदोलनास माझा व माझ्या सर्व सहकाऱ्यांचा पाठींबा असून आंदोलनासोबतच सर्व न्यायलयीन बाबीवर कायदेशीर सल्ला घ्यावा असे त्यांनी आवाहन केले. भुजबळांवर राजकीय हेतून प्रेरित होऊन कारवाई होताना दिसत आहे. मुळात आता कलम ४५ रद्द झाल्याने भुजबळ साहेबांना जास्त काळ डांबून ठेवता येणार नसून ते लवकरच आपल्यात असतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच भुजबळ साहेबांच्या समर्थनार्थ २६ जानेवारी रोजीच्या सर्व ग्रामसभांमध्ये त्यांच्या समर्थनार्थ ठराव करण्यात यावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनपा गटनेते गजानन शेलार म्हणाले की, छगन भुजबळ हे देश पातळीवरील नेते असून त्यांच्या मागची ताकद सरकारला दाखवून देण्यासाठी मुंबईत भव्य असा मोर्चा काढण्यात यावा. त्यात सर्व जातीधर्माचे सर्वपक्षीय लोकांनी सहभागी होण्यासाठी गाव पातळीपासून बैठका घेण्यात याव्या. तसेच त्यासाठी भुजबळ समर्थक समन्वय समित्या गठीत करण्यात याव्या. त्यांची एक मोट बांधावी असे सांगून अडचणीच्या काळात सर्व भुजबळ समर्थकांनी भुजबळ साहेबांच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. माजी आ. दिलीप बनकर म्हणाले की, नाशिक जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी छगन भुजबळ यांचे योगदान महत्वाचे आहे. भुजबळ यांनी जाती पातीच्या पलीकडे जावून सर्व समाजातील घटकांना एकत्र करत विकास केला आहे. जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासासाठी छगन भुजबळ हे आपल्यात असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्यावर होत असलेल्या या कारवाईबाबत कायदेशीर बाबी पडताळून मोठे आंदोलन उभे करावे असे आवाहन त्यांनी केले. माजी महापौर अशोक दिवे म्हणाले की, सद्याच्या सरकारकडून बहुजन समाजातील नेत्यांना संपविण्याचा डाव असून छगन भुजबळ यांच्यावर सूड बुद्धीने कारवाई होत असल्याच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आंदोलनाचा वनवा  पेटवावा असे आवाहन त्यांनी केले.यावेळी बोलतांना सुनील बागुल म्हणाले की,  नाशिकच्या विकासासाठी छगन भुजबळ यांचे मोलाचे योगदान आहे. विकासाची दृष्टी असणारे हे एकमेव नेतृव असून सरकार या बहुजन नेत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याने त्याविरुद्ध आवाज उठविण्याची आता गरज असल्याचे  त्यांनी यावेळी सांगितले.

Previous articleमहाराष्ट्राच्या जनतेचा मेक ओव्हर नीट करा
Next articleडहाणू-सांगलीतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून मदत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here