२०१९ ला परळीसहीत बीडचे सर्व मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात द्या
अजित पवार
परळी : हल्लाबोल यात्रा सुरु करताना या आंदोलनाला इतका जबरदस्त पाठिंबा मिळेल याची मला देखील कल्पना नव्हती. पण जनता या सरकारला त्रस्त झाली आहे, हे परळीच्या सभेला जमलेल्या गर्दीवरून दिसत आहे. मागे बीड जिल्ह्याने परळी सोडून सर्व जागा निवडून दिल्या होत्या. आता बीडने परळी सहित सर्व जागा निवडून द्याव्यात, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केले.
हल्लाबोल आंदोलनाच्या आजच्या पाचव्या दिवसाची शेवटची सभा परळी येथे पार पडली. परळीच्या हल्लाबोल सभेला तुफान प्रतिसाद मिळाला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामागे परळीकरांनी आपली सर्व ताकद लावलेली दिसली. यावेळी भाषण करताना अजितदादा म्हणाले की, स्व. पंडितअण्णा आज हयात असते तर आपल्या मुलाला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांना वेगळेच समाधान मिळाले असते. फक्त परळीच नाही, तर बीडसहीत राज्यांचे प्रश्न विरोधी पक्षनेते या नात्याने मुंडे मांडत असतात. बीडचे पालकमंत्रीपद कुणाकडेही असले तरी बीडचा विकास करण्याची धमक फक्त धनंजय मुंडे यांच्याकडेच आहे, असे वाक्य अजित पवार यांनी उच्चारताच सभेतील उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
अजित पवार पुढे म्हणाले, धनंजय मुंडे यांनी सभागृहात २२ मंत्र्यांचा घोटाळा बाहेर काढला. पण त्यांना जो नको होता तोच मंत्री चौकशीसाठी बाहेर काढला असे म्हणत अप्रत्यक्षरित्या त्यांनी एकनाथ खडसे यांची खंत बोलून दाखवली. बाकीच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लिन चीट देऊन टाकली. मोपलवार सारख्या अधिकाऱ्याची तर वेळेत चौकशी पूर्ण करुन त्याला पुन्हा त्याच पदावर रुजुही केले. कारण त्यांना मोपलवारच समृध्दी महामार्गाच्या प्रकल्पात हवे होते, अशी टीका अजित पवार यांनी केली.प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, बारामती नंतर जर कोणता मतदारसंघ चर्चेत असेल तर तो परळी आहे. परळीच्या जनतेने २०१९ साली धनंजय मुंडे यांना विधानसभेवर पाठवून जिल्हासहित राज्यांचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या भाषणातून मुंडे यांचे कौतुक केले. मुंडे विरोधी पक्षनेते झाल्यापासून आम्हाला अधिवेशनात रोज सरकारविरोधात त्यांची बॅटिंग पाहायला मिळते. विधानपरिषदेत धनंजय मुंडे आणि विधानसभेत अजितदादा भाषणाला उभे राहिले की सरकारला घाम फुटतो, अशी प्रतिक्रिया भाजपचेच लोक खाजगीत सांगत असल्याचे सुळे म्हणाल्या.धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात हल्लाबोल आंदोलनाला प्रचंद प्रतिसाद दिल्याबद्दल परळीकरांचे आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेसने मला विरोधी पक्षनेतेपद दिले म्हणूनच आज महाराष्ट्राला हा धनंजय मुंडे दिसत आहे असे ते म्हणाले.
विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या परळी या मतदारसंघामध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अतिविराट अशी सभा पार पडली. सभेला लोटलेल्या जनसागराने धनंजय मुंडे यांच्या कामाची आणि त्यांच्यावरील अफाट प्रेमाची पोचपावती दिली. या सभेमध्ये अजितदादा,प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्या कामाची स्तुती करत परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार असेल असे सांगतानाच २०१९ मधील निवडणूकीमध्ये परळीसह बीड जिल्हयातील सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे देण्याचे आवाहन परळीकरांना केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे परळीच्या प्रवेशद्वारावर जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी परळीच्या युवा कार्यकर्त्यांनी जबरदस्त ताकद रॅलीच्या माध्यमातून दाखवून दिली.
सभेपूर्वी जवळजवळ ४ ते ५ किलोमीटर अंतरावरुन हजारो युवा कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढून अजित पवार यांचे जोरदार स्वागत केले. सभेच्या सुरुवातीला पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, सौ. चित्रा ताई वाघ यांनी भाजप-शिवसेना सरकारवर हल्लाबोल केला.