मुलींच्या जन्माचे स्वागत करा

मुलींच्या जन्माचे स्वागत करा

महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे

सातारा :  मुलींच्या जन्मदराचे घटते प्रमाण हे समाज हितासाठी चांगले नाही. यासाठी शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरु केली असून या योजनेच्या माध्यमातून एक किंवा दोन मुलींवर कुटूंब नियोजन शस्त्रक्रीया करणाऱ्या मुलीच्या नावे ५० हजार दिर्घमुदतीची रक्कम ठेवण्यात येते. मुलीचे १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर १ लाख ४६ हजार रुपये मिळणार आहेत. यातून मुलींचे पुढील शिक्षण पूर्ण होऊन त्यांनी बाळगलेल्या स्वप्नांना बळ मिळणार आहे. यापुढे समाजाने मुलींच्या जन्माबाबतचे नकारात्मक विचार बदलून त्यांच्या जन्माचे स्वागत करुन आनंदत्सव साजरा करा, असे आवाहन महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज केले.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या  जन्मगावी नायगाव येथे आज माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या जाणीव जागृती अभियानांतग्रत प्रचार, प्रसिद्धी रथ यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. याप्रसंगी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, महिला व बाल विकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, आमदार संगीता ठोंबरे महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त लहुराज माळी, मुख्य कायकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाव व बेटी पढाव असा नारा दिला आहे. त्यांच्या नाऱ्याला महाराष्ट्र शासनही खंबरीपणे साथ देत आहेत, असे सांगून महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या,  माझी कन्या भाग्यश्री योजनेमुळे लोकांच्या विचारतही आता बदल होत आहेत. माझी कन्या भाग्यश्री प्रचार व प्रसिद्धी रथाला गावोगावी चांगला प्रतिसाद मिळाला आहे.  कमवा व शिका योजनेंतर्गत ५१ हजार युवक-यवुतींना कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यातील ७ हजार मुली आज शिक्षण घेत काम करीत आहेत. मुलींच्या जन्माबाबतचे नकारात्मक विचार बदलण्यासाठी तुम्हीही ठामपणे उभे रहा. तुम्ही भाग्यश्री आहात शासनाची ताकद तुमच्या पाठीशी आहे.

उद्योग उभारणीसाठी महिला बचत गटांना शासन शून्य टक्के व्याजदराने पैसे उपलब्ध करुन देते. याचा बचत गटांनी लाभ घेवून आपली आर्थिक उन्नती करावी. शाळा, मुलींना विकासाला डोळ्यासमोर ठेवून शासन विविध योजना राबवित आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थींनींचे आरोग्य चांगले रहावे यासाठी अस्मिता योजनेतून ५ रुपयांमध्ये सॅनिटरी नॅपकीन देण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांचे प्रतिबिंब तुमच्यात दिसले पाहिजे, यासाठी शिक्षण महत्वाचे आहे.  कुपोषण मुक्त महाराष्ट्र होण्यासाठी अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान मिळणार आहे. त्यांच्या थकीत वाढीव मानधनाबाबत येत्या  अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार असून पोषण आहाराच्या देयकांचा प्रश्नही मार्गी लावण्यात येईल.    ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी आल्यावर  चांगली ऊर्जा मिळते. या ठिकाणी भव्य सृष्टी निर्माण करण्यासाठी पर्यटन मंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शेवटी दिले.

Previous articleराज्य सरकार पतंजलीचे एजंट झाले आहे
Next articleयंदाचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहिर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here