संबंधित शेतक-याला २ लाख १८ हजार नुकसान भरपाई दिली
१० लाख प्रति हेक्टर आणि व्याजाचा मोबदला देणे विचाराधीन
उर्जामंत्र्याच्या कार्यालयाचा खुलासा
मुंबई : काल रात्री मंत्रालयाच्या परिसरात धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या ८४ वयाच्या शेतक-याने आत्महत्या केल्याचा प्रकार घडल्यानंतर उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयाकडून खुलासा करण्यात आला आहे. या शेतक-याने नुकसान भरपाईची रक्कम २.१८ लाख इतकी आहे व ही रक्कम सदर शेतकऱ्याने १३/०४/२०१७ रोजी स्वीकारलेली असून, महानिर्मितीमार्फत १० लाख प्रति हेक्टर दर व जानेवारी २०१२ पासून व्याजाच्या शासकीय दरानुसार एकूण व्याज असा जमिनीचा दर धरुन जमिनीचा मोबदला देणे विचाराधीन आहे असे यामध्ये म्हटले आहे.
वृत्ताची पार्श्वभूमी लक्षात घेऊन महानिर्मितीने यासंदर्भात वस्तुस्थितीवर आधारित तातडीचा खुलासा केला आहे.
महानिर्मितीमार्फत ५ x६६० मेगावॅट औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र उभारणीसाठी मौजे विखरण व मेथी येथे एकूण ८२५ हेक्टर जमिनीची आवश्यकता होती. सदर जमिनीपैकी १४९.६२ हेक्टर शासकीय जमीन ताब्यात घेणे प्रस्तावित होते. सदर शासकीय जमिनीपैकी ४८.७६ हेक्टर शासकीय जमिनीचा ताबा मिळाला असून उर्वरित १०३.८६ हेक्टर जमिनीचा ताबा घेणेसाठी पाठपुरावा सुरु असून, महानिर्मितीने शेतकऱ्याशी , जमीनमालकांशी जिल्हाधिकारी व महानिर्मितीच्या प्रतिनिधीसोबत जमीन दरासंबंधी चर्चा करुन संगनमताने वाटाघाटी करुन १० लाख प्रति हेक्टर दर देण्याचे मान्य केले व त्याप्रमाणे मौजे विखरण व मेथी येथील शेतकऱ्यांच्या खरेदीखत प्रक्रियाद्वारे ४७६.०५ हेक्टर जमीन प्रकल्पासाठी ताब्यात घेण्यात आली आहे. उर्वरित १९९.२७ हेक्टर शेतजमीन ताबा घेणेसाठी जमीन अधिग्रहण कायदा २०१३ नुसार जिल्हाधिकारी, धुळे यांचेकडे तीन प्रस्ताव दाखल केले आहेत त्यापैकी
(अ) ४/२००९ (मौजे मेथी येथील ३७.७९ हेक्टर), (ब) ७/२००९ (मौजे विखरण येथील ६३.२२ हेक्टर)
(क) ५/२०११ (मौजे विखरण येथील ९८.३१ हेक्टर)
सदर जमिनीचा मोबदला देणेसंबंधी अंतिम निवाडा जिल्हाधिकारी, धुळे यांचेमार्फत झालेला आहे. सदर निवाड्याप्रमाणे जमिनीचा मोबदला रक्कम महानिर्मितीमार्फत भूसंपादन अधिकारी यांचेकडे जमा करण्यात आली आहे. धर्मा मांगा पाटील यांच्या मालकीचे मौजे विखरण येथील जमीन गट क्र. २९१/२ अ चे क्षेत्र १.०४ हेक्टर शेत प्रस्ताव क्र. ७/२००९ मध्ये समाविष्ट आहे. या प्रस्तावाचा निवाडा दि. १७/०३/२०१५ रोजी झालेला असून, निवाड्याप्रमाणे जमीन नुकसानभरपाईची रक्कम २.१८ लाख इतकी आहे व ही रक्कम सदर शेतकऱ्याने दि. १३/०४/२०१७ रोजी स्वीकारलेली असून, महानिर्मितीमार्फत १० लाख प्रति हेक्टर दर व जानेवारी २०१२ पासून व्याजाच्या शासकीय दरानुसार एकूण व्याज असा जमिनीचा दर धरुन जमिनीचा मोबदला देणे विचाराधीन आहे असे शेवटी या खुलाश्यात स्पष्ट करण्यात आले आहे.