हिंमत असेल तर शिवसेनेने पाठिंबा काढावा
अजित पवार
परभणी ( पाथरी ) : आज राज्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिलेली नसून, लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढण्याची शिवसेनेनी आज केलेली घोषणा यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी टिका करीत अरे असे कशाला करता हिंमत असेल तर सरकारचा पाठिंबा काढा असे आव्हान देत सत्तेची ऊब घेतलेल्या शिवसेनाला ते करणे शक्य नाही. शिवसेनेची ही दुटप्पी भूमिका आहे असा थेट आरोप त्यांनी केला.
त्यांनी आपल्या भाषणामध्ये पेट्रोल-डिझेलच्या वाढवलेल्या दराबाबत सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी महाराष्ट्र वगळता इतर राज्यामध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कसे आहेत यांची आकडेवारी जाहीर सभेत जनतेसमोर मांडली. दिल्ली या देशाच्या राजधानीमध्ये ७२ रुपये आणि महाराष्ट्रामध्ये ८१ रुपये म्हणजेच ८ रुपयांचा फरक आहे.तोच दर गुजरातमध्ये ७१ रुपये म्हणजेच १० रुपयांचा फरक आहे.महाराष्ट्र सर्वकाही देत असताना पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रातच जास्त का असा सवाल अजितदादांनी सरकारला केला.
शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत सरकारच्या भूमिकेवरही अजित दादांनी हल्ला केला.पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्याला लाभ मिळण्याऐवजी तो लाभ कंपनीला कसा मिळत आहे याची सविस्तर माहिती जनतेसमोर ठेवली. शेतकऱ्यांकडून २२ हजार कोटी रुपये पीकविम्यापोटी जमा केले आणि शेतकऱ्याला पीक विम्याचे मिळाले किती तर फक्त ८ कोटी रुपये.असा अन्याय सरकार शेतकऱ्यावर का करत आहे असा संतप्त सवालही अजित पवार यांनी सरकारला केला.पाथरीच्या जाहीर सभेमध्ये जिंतूर,गंगाखेड,पाथरी,परभणीसह सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणा तुम्हाला योग्य तो न्याय देण्यात येईल असे आश्वासन अजित पवार यावेळी दिले.