मॅग्नेटिक महाराष्ट्रा’तील सहभागासाठी जागतिक उद्योग समूह उत्सुक
मुख्यमंत्री
मुंबई : दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेत मुंबईत पुढील महिन्यात होणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या उद्योग परिषदेसाठी जागतिक समुहात अनुकुल वातावरण तयार करण्यात यश मिळत असून अनेक आघाडीच्या संस्था-समुहांनी या परिषदेत सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान राज्य सरकारसोबत अन्न प्रक्रिया, प्लास्टिकचा पुनर्वापर आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात राज्य सरकारसोबत काम करण्याची तयारी कोकाकोला समुहाने दाखविली आहे.
या परिषदेतील महाराष्ट्र पॅव्हिलियनमध्ये आज कोकाकोलाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स क्विन्सी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी क्विन्सी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. या चर्चेत कोकाकोला समुहाने राज्य सरकारसोबत विविध क्षेत्रात सहयोग देण्याचे मान्य केले. तसेच भविष्यात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर्सच्या टप्प्यावर नेण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांबाबत केपीएमजी या संस्थेसोबत विचारविमर्श करण्यात आला. त्यामध्ये नवीन अर्थरचनेत रोजगार निर्मिती, ऑटोमेशन आणि पुन:कौशल्य या बाबींचा समावेश होता. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी आदी उपस्थित होते.