मॅग्नेटिक महाराष्ट्र धोरण शेतकर्‍यांना आत्महत्येसाठी चिथावणी देणारे

मॅग्नेटिक महाराष्ट्र धोरण शेतकर्‍यांना आत्महत्येसाठी चिथावणी देणारे

विखे पाटील यांची टिका

मुंबई : मेक इन महाराष्ट्र आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र धोरण मूठभर धनदांडग्यांचा गल्ला भरणारे आणि शेतकर्‍यांना आत्महत्येसाठी चिथावणी देणारे धोरण आहे असल्याची टिका विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आज यांनी जे.जे रूग्णालयात जाऊन मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील देखील उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याशिवाय सरकारला जाग येत नाही, हे मागील अनेक घटनांमधून स्पष्ट झाले आहे. मेक इन महाराष्ट्र आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र धोरण मूठभर धनदांडग्यांच्या गल्ला भरणारे आणि शेतकर्‍यांना आत्महत्येसाठी चिथावणी देणारे धोरण आहे. हे सरकार शिवाजी महाराजांचे नाव घेऊन शेतकर्‍यांची फसवणूक करते आहे.
धुळे जिल्ह्यातील एका मंत्र्याला तो मंत्री असल्याने तात्काळ जमिनीची खातेफोड करून मिळते, पण धर्मा पाटील सारख्या कोणताही वशिला आणि राजाश्रय नसलेल्या शेतकऱ्यांना मंत्रालयात येऊन विष घ्यावे लागते, ही परिस्थिती या सरकारने आज राज्यात निर्माण केली आहे.

धर्मा पाटील यांना सरकारने अत्यल्प मोबदला देण्यासंदर्भात विखे पाटील पुढे म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांंची कमी पैशात बोळवण करण्याचा प्रयत्न करते आहे. सरकारी दलालांमार्फत येणार्‍या शेतकर्‍यांना योग्य किंमत मिळते. पण दलालाच्या तुंबड्या न भरणाऱ्या शेतकर्‍यांवर जीव देण्याची वेळ येते, यातून हे सरकार नेमका काय संदेश देते आहे? आता धर्मा पाटलांनी विष घेतल्यावर सरकार अनुदान देण्याच्या घोषणा करते. मग हे शहाणपण आधीच का नाही सूचले? शेतकर्‍यांना सरकारी अनुदानाची भीक नको, आपल्या जमिनीची योग्य किंमत हवी आहे. धर्मा पाटील सारख्या सर्वसामान्य शेतकर्‍याला न्याय का नाकारला गेला, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी यावेळी केली.

Previous articleमला पक्षातून ढकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न
Next articleविद्युत प्रकाशाने एलिफंटा बेट आता लखलखणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here