पर्यावरणस्नेही शहरांसाठी राज्यात यंत्रणा उभारणार

पर्यावरणस्नेही शहरांसाठी राज्यात यंत्रणा उभारणार

 मुंबई  : राज्यातील शहरे स्मार्ट आणि स्वच्छ करण्यासाठी विविध अभियानांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रयत्न करण्यात येत असतानाच या प्रयत्नांना दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेत गती देण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले. सिमन्स आणि हिताची  या प्रमुख उद्योगसमुहांनी पर्यावरणस्नेही शहरांसाठी राज्य शासनासोबत काम करण्याची तयारी दर्शविली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिषदेच्या तिसऱ्या दिवशी सिमन्सच्या व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य सेड्रिक निक यांच्याशी चर्चा केली. स्मार्ट शहरे निर्माण करतानाच ती अधिकाधिक पर्यावरणानुकूल करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत यावेळी विस्ताराने चर्चा झाली. अशा शहरांच्या निर्मितीसाठी एक समग्र व्यवस्था उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत अधिक सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन  निक यांनी यावेळी दिले.

हिताची इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक भारत कौशल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या अधिक परिणामकारकतेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित काम करण्याचा मनोदय व्यक्त करतानाच महाराष्ट्रात पथदर्शी प्रकल्पाच्या दृष्टीने पुढाकार घेण्यात येईल, असे हिताचीतर्फे यावेळी सांगण्यात आले. माहितीच्या संकलनातून उत्पादकतेचा वेध घेण्याच्या तंत्रज्ञानासंदर्भातही चर्चा झाली. पिकांच्या उत्पादकतेसाठी या तंत्रज्ञानाचा अवलंब महाराष्ट्रात करण्यासंदर्भात तसेच यादृष्टीने संशोधन आणि विकास केंद्रासाठी पुढाकार घेण्याच्या दृष्टीनेही या चर्चेत भर देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी आदी उपस्थित होते.

Previous articleकुठे नेऊन ठेवलाय शेतकरी माझा
Next articleविखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी पोलिसांची हेरगिरी!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here