गांव तिथे विकास’ दौ-याला तपोवन येथून धडाक्यात प्रारंभ
हायमास्ट दिवे, आरओ सिस्टीमसह प्रत्येक गावाला किमान एक कोटीची विकास कामे
पंकजा मुंडे
परळी : विकासाच्या योजना गोरगरिबां पर्यंत पोहोचविण्यासाठीच गांव तिथे विकास दौरा काढण्यात येत आहे. रस्ते, पाणी, मुलभूत सोयींसह प्रत्येक गावांत हायमास्ट दिवे, शुध्द पाण्यासाठी आरओ सिस्टीमसह शासनाच्या विविध योजनेतून किमान एक कोटीची कामे मंजूर करण्यात आली असून सर्व गावे स्वयंपूर्ण करण्यासाठी आपण कटीबध्द राहू अशी ग्वाही राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी येथे दिली.
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या ‘गांव तिथे विकास’ दौ-याला आज तपोवन येथील महादेवाचे दर्शन घेऊन धडाक्यात प्रारंभ झाला त्यावेळी विविध गावात ग्रामस्थांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. या दौ-यात त्यांच्या हस्ते ग्रामीण भागातील विविध ठिकाणी मूलभूत विकास योजनेच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.
यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, परळी मतदारसंघात विविध योजनेच्या माध्यमातून कोटयवधींचा निधी विकासासाठी आणला आहे. ‘गांव तिथे विकास दौ-याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मूलभूत विकास योजनेच्या कामांचा आढावा व नागरिकांच्या समस्या आपण जाणून घेत आहोत. मतदारसंघातील प्रत्येक गांव विकासाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न आहे. आतापर्यंत अशी कामे केवळ कागदावरच पहायला मिळाली पण आता प्रत्यक्ष काम होत आहे.मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, जलसंधारण, अंतर्गत रस्ते, नाल्या, स्वच्छ भारत अंतर्गत शौचालय, डिजीटल शाळा, सभागृह, घरकुल आदी कामे प्राधान्याने केली आहेत. यापूर्वी प्रत्येक गावांत प्रवासी निवारा आपण बांधला आहे. आता या कामाबरोबरच प्रत्येक गांव अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी हायमास्ट दिवे तसेच शुध्द पाण्यासाठी आरओ सिस्टीम ला आपण यावेळी प्राधान्य दिले आहे. तीर्थक्षेत्र ‘क’ मधून तपोवनला २५ लाख रुपये निधी मंजूर केल्याचे त्या म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा खरपूस समाचार घेतला. ज्यांनी शेतक-यांना देशोधडीला लावले ते आज शेतक-यांविषयी खोटा कळवळा आणत आहेत. हल्लाबोल कसला करता? असा सवाल करत शेतक-यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ आम्हीच दिला आहे, हे स्पष्टपणे सांगताना त्यांनी समोर बसलेल्या शेतक-यांना आलेले कर्जमाफीचे एसएमएस लोकांना दाखवले. परळी मतदारसंघात ८५ कोटी कर्जमाफी झाली असून एकट्या सिरसाळा सर्कलमध्ये साडे चार हजार शेतक-यांना २१ कोटी माफी केली आहे.आम्ही त्यांच्यासारख्या थापा मारल्या नसून प्रत्यक्ष काम करून दाखवले असल्याचे त्या म्हणाल्या.