आवाज तर दणदणीत मग तो दाबतोय कोण
मुंबई : भाजपच्या तिरंगा यात्रेला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आवाज बसला होता.त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतला आहे. आवाज तर दणदणीत मग तो दाबतोय कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मी आज जास्त बोलणार नाही. माझा आवाज बसला आहे. पण माझा आवाज बसला असला तरी भाजपचा आवाज कुणीही दाबू शकत नाही. तशी कुणाचीही ताकद नाही असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी काल भाजपाच्या तिरंगा यात्रेमध्ये केले होते.वृत्तपत्र विक्रेता संघाचा परळ येथील शिरोडकर हाॅल येथे कार्यक्रम पार पडला त्यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख बोलत होते.
जी भुमिका घ्यायची आहे ती मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी घेणार असे सांगतानाच सरकार मध्ये आम्ही अर्धे मुर्धे आहोत,जेव्हा भूमिका घ्यायची आहे तेव्हा नक्की घेणार असेही ते म्हणाले.ज्या वेळेला भुमिका मांडायची असते तेव्हा ती बेधडकपणे मांडतो .संपूर्ण शिवसेना वृत्तपत्र विक्रेता संघाबरोबर आहे. शिवसेना काय करते ही तुम्हाला माहितीच आहे.वृत्तपत्र विक्रेता कोण आणि फेरीवाला कोण हे राजकारण्यांना कळायला हवे.बाळासाहेबांच्या लढ्यात तुम्ही सगळे खांद्याला खांदा लावून लढला आहात.वृत्तपत्राचे महत्व कधीही कमी होऊ शकत नाही.










