पोलिसांच्या हेरगिरीविरोधात विखे पाटील यांची राज्यपालांकडे तक्रार

पोलिसांच्या हेरगिरीविरोधात विखे पाटील यांची राज्यपालांकडे तक्रार

मुंबई :  विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी पोलिसांनी हेरगिरी केल्याच्या प्रकारासंदर्भात राज्यपालांकडे लेखी तक्रार केली आहे.

गेल्या गुरूवारी विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेचे कर्मचारी अनधिकृतपणे माहिती घेत असल्याचे तसेच पत्रकारांची छायाचित्रे काढत असल्याचे दिसून आले होते. यासंदर्भात विखे पाटील यांनी काल राज्यपालांना पत्र लिहून गृहखात्याविरूद्ध चौकशी व कारवाईचे निर्देश देण्याची मागणी केली आहे.

आपल्या पत्रामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी नमूद केले आहे की, हा प्रकार अत्यंत गंभीर आणि लोकशाहीला काळीमा फासणारा आहे. पोलिसांनी विधानसभा विरोधी पक्षनेत्याच्या शासकीय निवासस्थानी विनाअनुमती प्रवेश करणे, पत्रकारांची छायाचित्रे काढणे, हा प्रकार अत्यंत संतापजनक, निषेधार्ह आणि घटनात्मक पद असलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या मुलभूत हक्कांचा भंग आहे. या सरकारचा संविधानावर व लोकशाहीवर विश्वास आहे की नाही,असा गंभीर प्रश्न यातून उपस्थित होत असून,  ही बाब संविधान, लोकशाही, प्रजासत्ताक ही मूल्य नाकारण्यासारखीच आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना त्याच दिवशी विधानसभा विरोधी पक्षनेत्याला अशा लोकशाहीविरोधी प्रकारासंदर्भात राज्यपालांकडे दाद मागावी लागते, हे अत्यंत क्लेषदायक असल्याचेही विखे पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

Previous articleआवाज तर दणदणीत मग तो दाबतोय कोण
Next articleराज ठाकरे यांचे व्यंगचित्रातून भीमा कोरेगाव घटनेवर भाष्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here