महामंडळावरील नियुक्त्या लवकरच !
मुंबई : राज्यातील युती सरकारचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला असतानाही महामंडळांवरील नियुक्त्या न झाल्याने भाजपसह, शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज आहेत. विविध मुद्द्यावरून सध्या सरकार विरोधात वातावरण तयार झाल्याने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर रखडलेल्या विविध महामंडळांच्या आणि सरकारी समित्यांच्या नियुक्त्या फेब्रुवारी महिन्यात केल्या जाणार असल्याचे समजते.
राज्यात भाजप आणि शिवसेनेचे सरकार येवून तीन वर्षाचा कालावधी उलटूनही विविध महामंडळे , समित्यांवर नियुक्त्या न झाल्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे.लोकसभेच्या निवडणुकीसाठी एक वर्ष, तर विधानसभा निवडणुकीसाठी दीड वर्षांचा कालावधी बाकी आहे. सध्या विरोधी पक्षांनी विविध मुद्दे लावून धरल्याने सरकार विरोधात वातावरण निर्मिती झाली आहे.अशातच सर्वसामान्य कार्यकर्ता नाराज झाल्यास याची मोठी किंमत मोजायला लागू शकते. त्यामुळेच या महामंडळावरील आणि समित्यावरील नियुक्त्या फेब्रुवारी महिन्यात केल्या जाणार आहेत.
पुढील महिन्यात सुरू होणा-या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महामंडळावरील नियुक्त्या करून आमदार व पदाधिकाऱ्यांना खूष केले जाणार आहे. राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर यापूर्वीच्या विविध महामंडळावरील नियुक्त्या रद्द करण्यात आल्या असता, या निर्णयाला महामंडळांवरील पदाधिकाऱ्यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे महामंडळाच्या नियुक्त्या होण्यास विलंब झाला होता. मात्र आता महामंडळावरील नियुक्त्यांना ग्रीन सिंग्नल मिळाल्याने पदाधिकारी आणि आमदारांनी महत्वाच्या महामंडळासाठी लाॅबींगला सुरूवात केली आहे.