धर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमच्या खुर्च्या जाळून टाकील
मुंबई : वृध्द शेतकरी धर्मा पाटील यांचे काल निधन झाले . धर्मा पाटील यांची हत्या भाषण माफियांनी केली आहे. जे घडले ते विदारक आहे. याला राज्य करणे म्हणता येत नाही. मुख्यमंत्री राज्य चालवा, भाजप चालवू नका. धर्मा पाटलांच्या मृतदेहावर तुमचे राज्य आहे. धर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमच्या खुर्च्या जाळून टाकील.अशा कठोर शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राज्य सरकारवर टीका केली आहे.
सामना संपादकीयमध्ये काय आहे
भाषणबाजीने रोटी, कपडा आणि निवाऱ्याचा प्रश्न सुटणार नाही. धर्मा पाटील यांची हत्या भाषण माफियांनी केली आहे. जे घडले ते विदारक आहे. याला राज्य करणे म्हणता येत नाही. मुख्यमंत्री राज्य चालवा, भाजप चालवू नका. धर्मा पाटलांच्या मृतदेहावर तुमचे राज्य आहे. धर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमच्या खुर्च्या जाळून टाकील. धर्मा पाटील यांना मृत्यूस कवटाळावे लागले. कारण अधर्माच्या राज्यात त्यांचे ऐकणारे कुणी नव्हते. भाषण माफियांना डोलणारी व टाळ्य़ा वाजवणारी माणसे हवी आहेत. त्यामुळे ‘धर्मा’ पाटलांचे सत्य कोण ऐकणार?
धर्माजी पाटील यांची प्राणज्योत मालवली आहे, पण त्या विझलेल्या जिवाने महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या मनात जगण्या-लढण्याची ठिणगी पेटवली आहे. धर्मा पाटील हे धुळ्य़ातले सधन शेतकरी. ८४ वर्षांचा हा वृद्ध शेतकरी मुंबईत मंत्रालयाच्या दारात न्याय मागण्यासाठी येतो व न्याय नाकारला जातो तेव्हा त्याच मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करतो, राज्य उत्तम चालल्याचे हे लक्षण नाही. राज्यात व देशात ‘अच्छे दिन’ आले व सर्वत्र आबादी आबाद आहे असे चित्र रंगवणाऱ्या थापेबाज टोळीने धर्मा पाटील यांची हत्या केली आहे. धर्मा पाटील यांची सुपीक शेतजमीन ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारने संपादित केली, पण त्यांना योग्य मोबदला मिळाला नाही. पाच एकर जमिनीच्या बदल्यात त्यांना फक्त चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. धर्मा पाटील यांच्या पाच एकर जमिनीत आंब्याची 600 झाडे होती. त्यात विहीर होती, ठिबक सिंचन, विजेचे पंप होते, पण या पाच एकर बागायती शेतीला फक्त पाच लाखांचा मोबदला ही तर शेतकऱ्यांची निर्घृण थट्टाच म्हणायला हवी. एका बाजूला धर्मा पाटील यांना फक्त चार लाख रुपये नुकसानभरपाई मिळते. मात्र दुसरीकडे त्याच गटातील ७४ गुंठे शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्याला साधारण दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिली जाते. कुठे धर्मा पाटलांचे चार लाख आणि कुठे हे दोन कोटी? या प्रश्नाचे उत्तर मागण्यासाठी धर्मा पाटील तीन महिन्यांपासून
सरकारदरबारी खेटे
मारीत होते. जिल्ह्य़ातील सरकारी यंत्रणेने त्यांचा आवाज ऐकला नाही तेव्हा ते मंत्रालयात पोहोचले. तिथेही निराशा पदरी पडली तेव्हा त्यांनी त्याच मंत्रालयाच्या दारात विष पिऊन आत्महत्या केली. आत्महत्येनंतर १५ लाखांची मदत घेऊन सरकार धर्मा पाटलांच्या दारात उभे राहिले तेव्हा त्या कुटुंबाने ती १५ लाखांची ‘लाच’ सरकारच्या तोंडावर फेकली. ‘‘तुमची भीक नको, जमिनीचा योग्य मोबदला धर्मा पाटील मागत होते’’ असे उत्तर या कुटुंबाने दिले. प्रकल्प आणि विकासाच्या नावाखाली जमिनी ताब्यात घेण्यासाठी सरकारने ‘एजंट’ नेमले आहेत व ज्या जमिनीचे सौदे ‘एजंट’ करतील त्यांना दोन कोटी रुपये मिळतील नाहीतर धर्मा पाटील यांच्यासारख्यांच्या हातात फक्त चार लाख रुपये टेकवले जातील असा हा कारभार आहे. त्यामुळे धर्मा पाटील यांच्या हत्येस सरकारी यंत्रणाच जबाबदार आहेत आणि संबंधित खात्याचे मंत्री व अधिकारी यांच्यावर धर्मा पाटलांच्या मृत्यूबद्दल सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी कोणी करीत असेल तर ते चुकीचे नाही. आजचा विरोधी पक्ष ही मागणी करीत आहे, पण हेच लोक महाराष्ट्रात १५ वर्षे सत्तेवर होते व त्यांच्या काळात विदर्भ-मराठवाड्य़ातील १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे या काळातील सर्व मुख्यमंत्री व सरकारांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे. धर्मा पाटील यांनी
मंत्रालयाच्या पायरीवर
आत्महत्या केली त्या पायरीसमोर छत्रपती शिवरायांची भव्य तसबीर आहे. शिवरायांचे नाव घेऊन जे लोक राज्य करतात ते शिवरायांच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. शिवराय हे रयतेचे राजे होते. त्यांच्या काळात एखादा शेतकरी न्याय मागण्यासाठी दरबारात आला असता व अन्याय दूर न झाल्याने त्याने विष प्राशन केले असते तर छत्रपतींनी दरबारातील सरदार, वतनदारांचा कडेलोट केला असता. ८४ वर्षांचे धर्मा पाटील मुख्यमंत्र्यांच्या सहाव्या मजल्यावरील दालनाबाहेर पोहोचले होते. मुख्यमंत्री त्यावेळी ‘दावोस’ येथे परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी लवाजमा घेऊन गेले होते, पण त्यांच्या स्वदेशात तेव्हा शेतकरी आत्महत्या करीत होते. अशावेळी ही परदेशी गुंतवणूक काय चाटायची आहे? भाषणबाजीने रोटी, कपडा आणि निवाऱयाचा प्रश्न सुटणार नाही. धर्मा पाटील यांची हत्या भाषण माफियांनी केली आहे. जे घडले ते विदारक आहे. याला राज्य करणे म्हणता येत नाही. मुख्यमंत्री राज्य चालवा, भाजप चालवू नका. धर्मा पाटलांच्या मृतदेहावर तुमचे राज्य आहे. धर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमच्या खुर्च्या जाळून टाकील. धर्मा पाटील यांना मृत्यूस कवटाळावे लागले. कारण अधर्माच्या राज्यात त्यांचे ऐकणारे कुणी नव्हते. भाषण माफियांना डोलणारी व टाळ्य़ा वाजवणारी माणसे हवी आहेत. त्यामुळे ‘धर्मा’ पाटलांचे सत्य कोण ऐकणार?