सरकारचे काम कमी आणि प्रसिद्धीचाच सोस फार!

सरकारचे काम कमी आणि प्रसिद्धीचाच सोस फार!

विखे पाटील

मुंबई : भाजप-शिवसेनेच्या सरकारला प्रत्यक्ष कामे करण्याऐवजी प्रसिद्धीचाच सोस अधिक असल्याचे सांगून मंत्र्यांसाठी कंत्राटी पद्धतीने खासगी प्रसिद्धी अधिकारी नेमण्याच्या निर्णयावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.

यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, निष्क्रियतेमुळे सरकारचा जनसंपर्क कमी झाला असून, प्रसिद्धीसाठी आता त्यांना केवळ‘धनसंपर्का’चा आधार उरला आहे. या सरकारला लोकांची कामे करता आली नाहीत. त्यामुळे संपूर्ण राज्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, त्यामुळेच प्रतिमा उदात्तीकरणासाठी त्यांनी जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू केली आहे. राज्य सरकारकडे स्वतःचा जनसंपर्क विभाग आहे. हे खाते मुख्यमंत्र्यांकडेच आहे. तरीही या विभागावर अविश्वास दाखवून मंत्र्यांच्या प्रसिद्धीसाठी सरकारी खर्चाने कंत्राटी खासगी जनसंपर्क अधिकारी नेमले जात आहेत. हे सरकार कंत्राटी पद्धतीवर चालत असून, हे कंत्राटदारांचेच सरकार असल्याचा टोलाही विखे पाटील यांनी लगावला.

लोकांची कामे न करता केवळ कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी करून कितीही खोटी प्रसिद्धी केली तर त्याचा फार उपयोग होणार नाही. कारण सरकारने नुकत्याच केलेल्या ‘मी लाभार्थी’च्या जाहिरातींमधील फोलपणा चव्हाट्यावर आलेला आहे. त्यामुळे या सरकारने कितीही प्रसिद्धी केली तर जनता आता त्यावर विश्वास ठेवणार नाही, असे सांगून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेच्या तिजोरीतून होणारी ही उधळपट्टी थांबविण्याची मागणी केली. एकिकडे सामाजिक न्यायाशी संबंधित विभागांच्या निधीत कपात करायची, आधी विक्रमी पुरवणी मागण्या करून नंतर त्यांच्यावर बंधने आणायची आणि दुसरीकडे जाहिरातबाजीवर कोट्यवधी रूपये उधळण्याचा हा प्रकार निषेधार्ह असल्याचेही विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले आहे.

Previous articleग्रामीण भागातील मुलींना मिळणार ५ रुपयात सॅनिटरी नॅपकिन
Next articleप्रमोद डोईफोडे यांची कार्यवाहपदी निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here