‘सबका साथ-सबका विकास’ संकल्पना आणखी विस्तारित झाली

‘सबका साथ-सबका विकास’ संकल्पना आणखी विस्तारित झाली

मुख्यमंत्री

मुंबई  : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक आहे. या अर्थसंकल्पाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ‘सबका साथ-सबका विकास’ ही संकल्पना आणखी विस्तारित झाली आहे. सर्वसमावेशक असलेल्या या अर्थसंकल्पातून नवभारताच्या निर्मितीचा संकल्प करण्यात आला असून शेतकरी, गरीब, महिला, युवक, मागासवर्गीय आणि ज्येष्ठ नागरिक अशा विविध घटकांना त्यातून न्याय देण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, किमान आधारभूत किंमतीसंदर्भातील (एमएसपी) शेतकऱ्यांची सुमारे दोन दशकांची मागणी आज पूर्ण झाल्याने हा एक ऐतिहासिक क्षण आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनखर्चाच्या दीडपट एमएसपी प्राप्त होणार आहे. याशिवाय, शेतकऱ्यांसाठी जास्तीच्या बाजारपेठा उपलब्ध करण्यासह  शेतीक्षेत्रात पायाभूत सुविधा निर्मिती, अन्नप्रक्रिया उद्योग आणि फलोत्पादनास चालना देण्यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने सिंचन प्रकल्पांसाठी नाबार्डच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीचीही पूर्तता करण्यात आल्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. त्यासाठी मोदी, जेटली आणि नितीन गडकरी यांचा मी अतिशय आभारी आहे.

या अर्थसंकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ५० कोटी नागरिकांसाठी जगातील सर्वांत मोठी आरोग्य योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतून ५ लाख रूपयांपर्यंतचे आरोग्यकवच उपलब्ध होणार आहे. मुंबईची‘लाईफलाईन’ असलेल्या लोकल रेल्वे वाहतुकीला अधिक भक्कम करण्यासाठी ४० हजार कोटींची भरीव तरतूद ही मुंबईसह अवघ्या महाराष्ट्रासाठी आनंददायी आहे. आजवर इतका मोठा निधी कधीही मुंबईला प्राप्त झालेला नव्हता. मुद्रा योजनेच्या माध्यमातून १० कोटी लोकांना रोजगार देण्याचा प्रयत्न झाला आहे. यात ७ कोटी महिला आणि ५ कोटी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आहेत. त्यात आणखी ३ कोटी अतिरिक्त रोजगारनिर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही पायाभूत क्षेत्रात मोठा पुढाकार घेण्यात आला आहे. सर्वांसाठी घरे यासह उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून ८ कोटी घरगुती गॅस जोडणीतून सर्वसामान्य माणसाचे हित साधण्याचा प्रयत्न केला आहे. मध्यमवर्गीयांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक नवभारताच्या संकल्पनेवर आधारित या अर्थसंकल्पाबद्दल प्रधानमंत्री, अर्थमंत्री आणि मुंबईसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिल्याबद्दल रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे मन:पूर्वक आभार मानतो, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Previous articleआत्ममग्न सत्ताधुंदांचा दिशाभूल करणारा अर्थसंकल्प
Next articleझोपडीधारकांचे मंत्रालयात ठिय्या आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here