झोपडीधारकांचे मंत्रालयात ठिय्या आंदोलन
मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पात २०२२ पर्यंत सर्वाना घरे देण्याचे आश्वासन दिले असतानाच मालाड येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरांच्या मागणीसाठी शेकडो झोपडीधारकांनी ओंकार विकासकाने केलेल्या अन्यायाच्या विरोधात आज चक्क मंत्रालयातच ठिय्या आंदोलन केले .
मालाड पूर्व येथील कुरार येथिल शांताराम तलाव जानू भोईर गृहनिर्माण संस्थेच्या शेकडो रहिवाश्याना ओंकार विकासकाने अपात्र घोषित केले असल्याने अनेकांना हक्काची घरे मिळणार नाहीत.या अन्याया विरोध येथिल झोपडीधारकांनी आपल्या प्रश्नाकडे सरकारने लक्ष वेधावे यासाठी चक्क मंत्रालयातच ठिय्या आंदोलन केले. गेल्या चार वर्षांपासून इमारतींचे बांधकाम सुरु आहे . एकूण सहा इमारतींपैकी तीन इमारतींचे काम पूर्ण झाले असूनही विकासकाने शेकडो लोकांना अपात्र घोषित केले आहे . यावर नगरविकास विभाग आणि झोपू कार्यालयात खेटे मारूनही याबाबत योग्य दाखले मिळत नसल्याने थेट मंत्रालयातच आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आंदोलकांनी सांगितले. या आंदोलकांनी प्रथम गृहनिर्माण विभागाचे सचिव संजय कुमार यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी ही भेट नाकारल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे . झोपडीधारकांनी अचानक मंत्रालयातल्या त्रिमूर्ती प्रांगणात ठिय्या दिल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली .