ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरणास चालना देणारा अर्थसंकल्प
– मंत्री पंकजा मुंडे
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत सादर केलेला अर्थसंकल्प ग्रामीण विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान करणारा तसेच महिलांच्या आर्थिक, सामाजिक सक्षमीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देणारा आहे. या अर्थसंकल्पामुळे देशाच्या विकासदरात येत्या काळात आणखी सुधारणा होईल, अशी प्रतिक्रिया राज्याच्या ग्रामविकास, महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासासाठी १४.३४ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ७० लाख इतके नवीन रोजगार निर्माण करण्याचे उद्दीष्ट या अर्थसंकल्पातून जाहीर करण्यात आले आहे. गावातील लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी २ हजार ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नागरीकांना ५ लाख रुपयांचे आरोग्यकवच मिळवून देणारी महत्वकांक्षी योजना अर्थमंत्र्यांनी जाहीर केली आहे. बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने ७५ हजार कोटी रुपये इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय मुद्रा योजनेतून ३ लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात येणार असून त्यातील मोठा हिस्सा हा महिलांना उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील स्वच्छतेची चळवळ गतिमान करण्यासाठी ६ कोटी शौचालये बांधण्याचा निर्धार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना कर्जासाठी ११ लाख कोटी रुपयांची तरतूद मान्य करण्यात आली आहे.
शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुत करण्यावर यात भर देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील पायाभुत विकासाला प्राधान्य देताना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक कोटी घरांची निर्मिती व २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर हे उदिष्ट पुर्ण करण्याचा संकल्प सरकारने केला आहे. ई – नाम नावाने ग्रामीण बाजार, येत्या खरीपापासून शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा करुन सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शेतीमालाच्या मार्केटिंगवरही भर देण्यात आला आहे. एकुणच ग्रामीण विकासाला चालना व शेतकऱ्यांना पाठींबा देणारा व देशाच्या आशा – आकांक्षा मजबुत करणारा हा अर्थसंकल्प आहे. शेतकरी, महिला, ग्रामीण नागरीक अशा सर्वांच्या हिताला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पातून पुढील काळात देशाच्या विकासाला अधिक गती प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.