औरंगाबाद मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सरकारवर करणार ” हल्लाबोल”

औरंगाबाद मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सरकारवर करणार ” हल्लाबोल”

औरंगाबाद : राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल यात्रा सुरु केली. हल्लाबोल यात्रेचा दुसऱ्या टप्पा मराठावाड्यातील सर्व जिल्ह्यात नुकताच संपन्न झाला. याचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या शनिवार, ३ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे होत आहे.

सकाळी ११ वाजता क्रांतीचौक ते मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढण्यात येईल. आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर दुपारी २ वाजता भव्य सभा घेऊन दुसऱ्या टप्प्याची सांगता केली जाईल.  समारोप सभेसाठी औरंगाबाद नगरी पुर्णपणे राष्ट्रवादीमय झाली आहे. सरकारविरोधातील बॅनर, राष्ट्रवादीचे झेंडे, पताका यांनी औरंगाबाद शहरात वातावरण निर्मिती झाली आहे. मोर्चा व सभेला माजी मंत्री प्रफुल्ल पटेल , प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्यासह पक्षाचे मराठवाड्यातील सर्व आमदार, सेलप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

याआधी १६ ते २४ जानेवारी दरम्यान मराठावाड्यातील आठही जिल्ह्यात घेतलेल्या सभांना जनतेचा अभूतपुर्व असा पाठिंबा मिळाला होता. हल्लाबोल मोर्चा व सभा यशस्वी करण्यासाठी शुक्रवार पासून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. सतीश चव्हाण, कोषाध्यक्ष हेमंत टकले, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी तयारीचा आढावा घेतला. सर्व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मोर्चा व सभेला उपस्थित राहणार असल्यामुळे सरकारविरोधातला हा निर्णायक लढा असल्याचा विश्वास मराठवाड्यातील जनतेमध्ये निर्माण झाला आहे.

Previous articleयेत्या मंगळवारी दोन्ही काॅग्रेसची महत्वपूर्ण बैठक !
Next articleभाजप आमदार देशमुख आमदारकीचा राजीनामा देणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here