खोटारड्या सरकारला खाली खेचण्यासाठी सज्ज रहा
शरद पवार यांचे आवाहन
औरंगाबाद : युवकांमध्ये क्रांती करण्याची शक्ती असते. राज्यातील खोटारड्या सरकारने सर्वच घटकाबरोबर युवकांचा विश्वासघात केला आहे त्यामुळे हे सरकार खाली खेचण्यासाठी आता युवकांनी सज्ज व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबादच्या विराट हल्लाबोल सभेमध्ये केले.
शरद पवार यांनी या विराट सभेमध्ये सरकारला निर्वाणीचा इशारा देताना या राज्यातील तरुण येत्या निवडणूकीमध्ये ऐतिहासिक कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला. या विराट आणि ऐतिहासिक सभेमध्ये शरद पवारांनी तरुणांना हाक देताना या खोटारडया सरकारला खाली खेचण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. सभेच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आमदार सतिश चव्हाण यांनी शरद पवार यांना मराठवाडयाच्यावतीने रुमणं भेट दिले.
सभेमध्ये शरद पवार यांनी अनेक मुदयांना हात घातला. आज राज्यातील जनता सरकारविरोधी अस्वस्थ आहे. राज्यात १६ हजार लोकांनी आत्महत्या केल्या. याप्रकरणी कुणाला दोष द्यावा. मुलाबाळांचा विचार न करता माणूस आत्महत्या करतो. मला सांगा कुणाला जीव नकोय झाला आहे. जेव्हा त्याच्या कुवतीच्या बाहेर जातो त्यावेळी तो आत्महत्या करतो. आज बोंडअळीने शेतकरी उध्वस्त झाला आहे. या शेतकऱ्यांना काही कंपन्या आणि आम्ही मदत करु असं सांगत आहेत मात्र एकही दमडा दिलेला नाही. उत्पादन खर्चाच्या दीडपट रक्कम देण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र ते सगळं खोटं आहे. राज्यातील २५ पिकांना अशाप्रकारची किंमत देणार असे सरकारने जाहीर केले आहे. परंतु अशाप्रकारची पाहणी केंद्र आणि राज्यसरकारने केली का ?सरकारकडे खरेदी करण्याची यंत्रणा आहे का? अर्थसंकल्पामध्ये तशी तरतुद केली आहे का? हे सगळे शेतकऱ्यांना कशाच्या आधारावर सांगता असा सवाल शरद पवार यांनी सरकारला केला.
आज आठ महिने झाले. कर्जमाफी झाली का?निव्वळ घोषणाच या सरकारने केल्या आहेत. ८६ हजार कोटीचा कर्जपुरवठा ९ लाख कोटीपर्यंत आम्ही पोचवला. परंतु गेल्या साडेतीन वर्षात भाजप सरकारने फक्त २ लाखांची वाढ केली आणि कर्ज देण्याचे बंद केले. या सरकारने राज्यातील जनतेला दिले काय तर फक्त बेरोजगारी आणि धार्मिक दंगली असा आरोपही शरद पवार यांनी केला.
आज देशात आणि राज्यात बेरोजगारी,कारखानदारीसंदर्भात पाऊले टाकली का? तर नाही. परंतु तरुणांमध्ये नैराश्य निर्माण करण्याचे काम सरकार करत आहे. निव्वळ धार्मिक दंगली घडवायला हे सरकार लागले आहे. हे कसले राज्यकर्ते असा संतप्त सवालही पवार यांनी केला.आज शेतकरी अडचणीत आहे. त्याला मदत करण्याचे सोडून त्यांच्या शेतीला दिला गेलेला वीजपुरवठाही हे तोडत आहेत. त्यामुळे या सरकारच्या विरोधात महाराष्ट्राच्या खेडयापाडयातील तरुण बदल केल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वासही पवार यांनी व्यक्त केला