छगन भुजबळांवरील अन्यायाच्या निषेधार्थ मुंबईत विराट मोर्चा

छगन भुजबळांवरील अन्यायाच्या निषेधार्थ मुंबईत विराट मोर्चा

नाशिक : बहुजन समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात मुंबईत विराट मोर्चाच्या माध्यमातून रणशिंग फुंकण्याचा निर्धार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या आज झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला. आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नाशिक येथे पार पडली. या बैठकीत भुजबळांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ राणीचा बाग ते आझाद मैदान असा विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याचा समता सैनिकांनी निर्धार व्यक्त केला.

या बैठकीत भुजबळांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ मार्च महिन्यात मुंबईत विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व पक्षातील भुजबळांचे समर्थक असलेले आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार तसेच ज्येष्ठ नेत्यांची राज्यस्तरीय समिती नेमून या समितीच्या बैठकीमध्ये मोर्चाची तारीख जाहीर केली जाईल. मोर्चासाठी समता परिषदेच्या जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना प्रत्येक जिल्ह्यात सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधण्याची जबाबदारी देण्यात आली. तसेच विभागीय स्तरासह प्रत्येक जिल्ह्यात सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठका घेऊन हा मोर्चा यशस्वी करण्याची जबाबदारी देण्यात आली.

बापू भुजबळ म्हणाले की,  छगन भुजबळ यांच्यावर सद्याच्या व्यवस्थेकडून सूडबुद्धीने कारवाई सुरु असून यामागे राजकीय षड्यंत्र आहे. मात्र आमचा न्यायालयीन प्रक्रियेवर पूर्णपणे विश्वास आहे. मात्र सद्याच्या व्यवस्थेकडून न्याय व्यवस्थेला तडा देण्याचा प्रयत्न होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधिशांना माध्यमांसमोर येण्याची वेळ आली ही खेदाची बाब आहे. लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासणारी ही घटना आहे. लोकशाही व्यवस्थेत व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याने कलम ४५ रद्द झाले त्यात अनेक लोकांना जामीन मिळाला. मात्र भुजबळांना अजून देखील जामीन मिळाला नाही.  तसेच सानपाडा येथे शैक्षणिक कामासाठी दिलेला भूखंड सूडबुद्धीने जप्त केला गेला असल्याचे सांगून शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचे त्यांनी सांगीतले. त्यामुळे आता रस्त्यावर उतरण्याची गरज असून त्यासाठी प्रत्येक शहर प्रत्येक गाव आणि वाड्या वस्तीत जनजागृती करून लोकांना एकत्र करून आंदोलनासाठी सहभागी करावे असे आवाहन त्यांनी केली.

Previous articleशिवसेना स्वबळावर लढणार आणि जिंकणार
Next articleमिलिंद एकबोटेंना शरद पवारांनी पाठिशी घातले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here