मुंबई महापालिकेच्या कामाची कॅगमार्फत चौकशी करा

मुंबई महापालिकेच्या कामाची कॅगमार्फत चौकशी करा , खरा डल्लामार समोर येईल

धनंजय मुंडे याचा सेनेवर पलटवार​

मुंबई  :  मुंबई महापालिकेच्या मागील दहा वर्षांच्या कामाची कॅगमार्फत चौकशी करा, म्हणजे खरा डल्लामार कोण आहे? हे जनतेसमोर येईल असा पलटवार विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

मराठवाड्यातील हल्लाबोल यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे सत्ताधारी भाजप व सेनेने धसका घेतला आहे. औरंगाबाद येथे झालेल्या समारोप सभेत राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पैठण येथील सभेत हल्लाबोल यात्रेला डल्लामार असे संबोधून टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना मुंडे म्हणाले की, मुंबई मनपात रस्ते, नाले, टॅब, आरोग्य सुविधा या सर्वच सेवात डल्ला मारलेला आहे. त्यामुळे सेनेनी डल्ल्याची भाषा करु नये. रायगड येथे मुख्यमंत्र्यांनी केलेली टीका असो किंवा उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका दोन्ही पक्षांनी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाचा प्रचंड धसका घेतला असल्याचे  मुंडे म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेतील मागील १० वर्षाच्या कामाची कॅग मार्फत चौकशी करा म्हणजे रस्त्यांपासून, खड्डयांपर्यंत आणि नाल्यापासून कच-यापर्यंत कोणी डल्ला मारला हे समजेल. असे ट्विट  मुंडे यांनी केले आहे. कॅग मार्फत चौकशीची आपण सातत्याने ३ वर्षांपासून मागणी करीत असल्याचे हि त्यांनी म्हटले आहे.

Previous articleभुजबळ समर्थकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
Next articleमीरा भाईंदरच्या आयुक्तपदी बी. जी. पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here