…तर उरलेल्या तुरीचे शेतकऱ्यांनी पकोडे तळायचे का?
विखे पाटील
तूर खरेदीतील एकरी मर्यादा रद्द करण्याची मागणी
मुंबई : राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना एकरी सरासरी ८ ते १० क्विंटल उत्पादन झाले असताना सरकार त्यातील मोजकीच तूर खरेदी करणार असेल तर उरलेल्या तुरीचे पीठ करून पकोडे तळायचे का, अशी संतप्त विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
तूर खरेदीबाबत एकरी मर्यादा घालणाऱ्या परिपत्रकावरून सरकारवर टीकेची झोड उठवताना विखे पाटील म्हणाले की, एक तर मुळात शासकीय तूर खरेदीसाठी उशीर झाला आहे. त्यातच सरकारने शासकीय तूर खरेदीसाठी घातलेली जिल्हानिहाय एकरी मर्यादा शेतकरी विरोधी असून, यासंदर्भातील परिपत्रक तातडीने मागे घेतले पाहिजे. या परिपत्रकानुसार खरेदी झाली तर अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याच्या एकूण उत्पादनाच्या एक तृतियांश तूर देखील हमीभावाने खरेदी होणार नाही. काहीही झाले तरी आम्ही सरकारला संपूर्ण तूर खरेदी करायला भाग पाडू. सरकार हे अन्यायकारक परिपत्रक मागे घेणार नसेल तर काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून सरकारला सळो की पळो करून सोडेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मंगळवारी यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याची माहिती देखील विरोधी पक्षनेत्यांनी दिली.