जेव्हा …मंत्री गिरिष बापट काॅग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीत जातात
मुंबई : आघाडी संदर्भात आज दोन्ही काॅग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू असतानाच या बैठकीच्या ठिकाणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरिष बापट पोहचतात तेव्हा दोन्ही काॅग्रेसच्या नेत्यांच्या भुवया उंचावतात.मात्र मंत्री बापट ज्या कारणासाठी आले हे समजल्यावर सर्वांना हायसे वाटले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली.या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार,विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील,धनंजय मुंडे,माणिकराव ठाकरे,जयंत पाटील,जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते. भाजप सरकारच्या विरोधात लढण्यासाठी या बैठकीत चर्चा सुरू असतानाच राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरिश बापट येत असल्याचा निरोप बैठकीत असलेल्या नेत्यांना मिळाल्याने त्यांच्या भुवया उंचावल्या.मंत्री महोदयांचे या ठिकाणी येण्याचे काय प्रयोजन असावे यावर कुजबूज सुरू असतानाच मंत्री बापट यांनी या बैठकीच्या खोलीत प्रवेश केला.त्यांनी सर्वांना नमस्कार करीत आपल्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी आलो असल्याचे या नेत्यांना सांगितले आणि नंतर या ठिकाणी हास्यकल्लोळ सुरू झाला.दोन्ही काॅग्रेसचे नेते एकाच ठिकाणी असल्याने सर्वांना एकाच वेळी लग्न पत्रिका देता येईल म्हणून हा मुहूर्त साधला असे मंत्री बापट यांनी सांगताच एकमेकांना हसू अनावर झाले.