तोरणमाळ हिल रिसॉर्ट कंपनीशी कोणताही संबंध नाही
जयकुमार रावल यांचा खुलासा
मुंबई : तोरणमाळ हिल रिसॉर्ट प्रा. लि. या कंपनीशी माझा कोणताही संबंध नाही. या कंपनीशी व्यक्तिश: माझा भूतकाळात आणि वर्तमानातदेखील तिळमात्रही संबंध नव्हता आणि नाही. मी या कंपनीत ना कधी संचालक होतो वा आहे, ना कधी भागधारक होतो वा आहे. तसेच या रिसॉर्टसंदर्भात माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात कोणतीही क्रिया – प्रक्रिया झालेली नाही. तरीही या संदर्भात माझ्यावर आरोप करण्यात आले असून ते पूर्णत: तथ्यहीन आणि खोटे आहेत असा खुलासा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी करून विरोधकांनी आरोप करताना ते पुरावे व कागदपत्रांनिशी करावेत असे आव्हान दिले आहे.
यासंदर्भात माहिती घेतली असता, साधारण १९५७-६० च्या काळात तोरणमाळ येथे कुडाच्या झोपड्याच होत्या. १९९० – ९१ च्या काळात एमटीडीसीने रितसर प्रकिया करुन तोरणमाळ रिसॉर्ट हे तोरणमाळ हिल रिसॉर्ट प्रा. लि. या कंपनीस भाडेतत्वावर चालविण्यास दिले व बरीच वर्षे त्यांनी नियमीतपणे भाडेदेखील भरले. तेव्हा मी शालेय , महाविद्यालयीन विद्यार्थी होतो. जे. जे. रावल हे त्यावेळी या भागीदार कंपनीचे संचालक होते. तथापी, सन २००० मध्ये त्यांनीही या कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या कंपनीच्या कामकाजाशी तब्बल १८ वर्षांपासून त्यांचाही काही संबंध राहीला नाही. रावल परिवाराचा कुणीही सदस्य या कंपनीचा संचालक नाही. सन २००० पासून राजेश रेशमवाला हे ही कंपनी चालवत आहेत. या पूर्ण कालावधीत मी व्यक्तिश: कधीही कंपनीचा संचालक किंवा भागधारक नव्हतो. तसेच या रिसॉर्टसंदर्भात माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात कोणतीही क्रिया – प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे सदर रिसॉर्ट बेकायदेशीर हडपल्याचा वा मंत्रीपदाचा दुरुपयोग केल्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
तथापी, सन २००६ मध्ये ही कंपनी व एमटीडीसी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. ही कंपनी आणि एमटीडीसी यांच्यामध्ये सध्या दिवाणी व उच्च न्यायालयात केस सुरु आहे. त्यामुळे या विषयावर भाष्य करणे योग्य नाही. विरोधकांनी आरोप करण्याऐवजी आपल्या आरोपासंदर्भात योग्य कागदोपत्री पुराव्यांनिशी वैधानिक मार्ग अवलंबावा, असे माझे त्यांना आव्हान आहे.
माझ्यावर आरोप करणारे हेमंत देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे
· द्वारकाधीश उपसा जलसिंचन योजना, विखरण
· धुळे जिल्हा सहकारी बँक
· शिंदखेडा सहकारी साखर कारखाना
· महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
आदी विविध प्रकरणांमध्ये घोटाळ्याच्या केसेस सुरु आहेत. त्यांच्याविरोधात एसीबीच्या दोन चौकशा सुरु आहेत.
हेमंत देशमुख हे सध्या चर्चेत असलेल्या मौजे विखरण येथील द्वारकाधीश उपसा जलसिंचन सहकारी सोसायटीचे अध्यक्ष होते तर रामसिंग शहाणा राजपूत हे या सोसायटीचे सचिव होते. सध्या चर्चेत असलेल्या विखरण विद्युत प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनातील एजंटमार्फत करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराशी राजपूत हे संबंधीत असून डॉ. योगेश गिरासे प्रतिष्ठान या नावाने कोट्यावधीची संपत्ती बँक खात्यावर जमा केल्याबाबत माहिती आहे. विखरण येथील भूसंपादन प्रकरणी सत्यस्थिती जनतेसमोर यावी म्हणून विशेष तपासणी पथकाची स्थापना करण्याबाबत मी मुख्यमंत्री महोदयांकडे पत्राद्वारे मागणी केलेली आहे.
मी ज्यांचा दोन वेळा निवडणूकीत पराभव केला ते हेमंत देशमुख यांचे स्वत:चे हात भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत. हेमंत देशमुख यांच्याविरोधात एसीबीच्या २ चौकशी अंतिम टप्प्यात आहे. अशा भ्रष्टाचारात बरबटलेल्या व्यक्तिंच्या माहीतीच्या आधारे राजकीय द्वेषातून माझ्यावर निराधार आरोप करण्यात येत आहेत. त्यांना त्यांच्या आरोपात तथ्य वाटत असेल तर ते त्यांनी वैधानिक मार्ग अवलंबावा, असे माझे त्यांना आव्हान आहे.माध्यमांसमोर तथ्यहीन आणि अर्धसत्य माहिती देऊन संभ्रम निर्माण केला जात आहे आणि त्यातून माझी प्रतिमा मलिन करुन राजकीय फायदा उठविण्याच्या हेतूने हेमंत देशमुख व समुह यांच्या माहितीवर आधारीत सातत्याने आरोप करण्यात येत आहेत.
सध्या माझे मतदारसंघात तसेच मंत्री म्हणून राज्य स्तरावर चांगले कामकाज सुरु आहे. विविध लोकोपयोगी योजना व कामांमुळे माझ्या मतदारसंघातील शिंदखेडा व दोंडाईचा नगरपालिका, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी – विक्री संघ या संस्थांमधील विरोधकांचे अस्तित्व संपुष्ठात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वत:चे अस्तित्व राखण्यासाठी विरोधक माझी प्रतिमा मलिन करुन राजकीय फायदा उठविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याच गैरहेतूने माझ्यावर हे आरोप करण्यात आले असून विरोधकांमध्ये धमक असल्यास त्यांनी वैधानिक मार्ग अवलंबावा, असे आव्हान मी त्यांना करतो.विरोधक रोज उठसूठ माझ्यावर तथ्यहीन आरोप करतील व मी खुलासा देत बसेन, असे होण्यापेक्षा विरोधकांनी मिडीया ट्रायल करण्याऐवजी योग्य त्या फोरमवर जाऊन तक्रार करावी, कायदा आपली योग्य भूमिका निभावेल, असा मला विश्वास आहे.