नारायण राणे यांची औरंगाबाद येथे रविवारी जाहीर सभा
मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांची येत्या रविवारी औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता औरंगाबाद येथील रामलीला मैदानावर होणाऱ्या या सभेत राणे राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर काय भाष्य करतात याकडे अवघ्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसच्या सदस्यपदाचा तसेच आमदारकीचा राजिनामा दिल्यानंतर आपल्या निष्ठावंत आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी राज्याच्या दौऱ्याचे सुतोवाच राणे केले होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची कोल्हापूर येथे पहिली जाहीर सभा पार पडली. या सभेला राणे यांना मानणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्तपणे गर्दी केली होती. त्यानंतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ यासारख्या राज्याच्या इतर भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी जाहीर सभांचे नियोजन करण्यात येत होते. मात्र मधल्या काळात घडलेल्या भीमा कोरोगाव सारख्या घटनांमुळे या नियोजनात काहीसा बदल करण्यात आला. नव्या नियोजनानुसार येत्या रविवारी औरंगाबादच्या रामलीला मैदानावर सायंकाळी पाच वाजता राणे मराठवाड्यातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.