राज ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा !
मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एक व्यंगचित्र रेखाटत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणाचा समाचार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकारणासाठी काँग्रेसच्या माजी नेत्यांची गरज का भासते त्यांनी आपल्या व्यंगचित्रातून उपस्थित केला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी परवा संसदेत केलेल्या भाषणात नेहरू-पटेल वाद उकरून काढत, सरदार पटेल यांना काँग्रेसने पंतप्रधान न बनवून अन्याय केल्याचा आरोप केला होता. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी याच मुद्दाला हात घालत व्यंगचित्र रेखाटले आहे. यामध्ये महात्मा गांधी हे मोदींना समजावून सांगताना रेखाटले आहे ”अरे बेटा नरेंद्र, तुला जरा दोन गोष्टी सांगायच्या आहेत! जवाहरलालना पंतप्रधान मी केले, काँग्रेसने नाही. यावर काही बोलायचंय? आणि दुसरे म्हणजे वल्लभभाई जरी देशाचे गृहमंत्री होते, तरी ते काँग्रेसचेच नेते होते ना? मग तुला त्यांचा पुतळा का उभारावासा वाटला! पण, तू जिथून आलास, त्या हेडगेवारांचा किंवा गोळवलकरांचा पुतळा उभारावासा का नाही वाटला? प्रचारक होतास ना तू? असा सवाल केला आहे.