मंत्रालय म्हणावे की स्मशान

मंत्रालय म्हणावे की स्मशान

मुंबई : बेरोजगार तरूणांनी सरकारच्या दारात ‘पकोडे’ तळायचे की, मंत्रालयात जावून आत्महत्या करायची याचे उत्तर मिळायला पाहिजे असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावले आहे. आजच्या सामना संपादकीयतून मंत्रालयात होणा-या आत्महत्यांवरुन त्यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.

काय आहे आजच्या अग्रलेखात

हे राज्य कल्याणकारी व्हावे, मराठीजन, शेतकरी, कष्टकरीजनांचे भले व्हावे म्हणून राज्याचा मंगल कलश मंत्रालयात आणला. मंत्रालयासह महाराष्ट्राची सध्याची अवस्था पाहता मंगल कलशालाही पाय फुटतील व अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनखाली राज्याच्या आशा आकांक्षांचा हा मंगल कलश आत्महत्या करील अशी भीती आम्हाला वाटते. मंत्रालयात जनतेला रयतेचे राज्य असल्याचा अनुभव यायला हवा. मात्र सध्या विपरीतच घडत आहे. जिवंत माणसे मंत्रालयात येतात आणि तेथे जीव देतात. मंत्रालयावर निरपराध्यांच्या रक्ताचे शिंतोडे उडत आहेत व आत्महत्या करणा-यांच्या किंकाळया घुमत आहेत. मंत्रालय म्हणावे की स्मशान, अशी भयंकर स्थिती निर्माण झाली आहे असा टोला लगावला आहे.

महाराष्ट्राचे मंत्रालय हे जणू स्मशान झाले आहे. मंत्रालय हे राज्यातील जनतेच्या आशा आकांक्षांचे, भावनांचे प्रतिबिंब असते. मंत्रालयाच्या दर्शनी भागात छत्रपती शिवरायांची तसबीर आहे, तर सहाव्या मजल्यावर म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आहे. हेच महाराष्ट्राचे मंत्रालय आता जनतेच्या आशाआकांक्षांचे थडगे झाले आहे व मंत्रालयातील अनेक दालनांत निर्जीव व भावनाशून्य पुतळेच खुर्च्यांवर बसवले आहेत की काय असा भास निर्माण झाला आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघात तरुणांसाठी ‘सेल्फी पॉइंट’ निर्माण केले आहेत; पण मंत्रालय सध्या ‘सुसाईड पॉइंट’ म्हणजे आत्महत्या करण्याचे ठिकाण झाले आहे. गेल्या काही दिवसांत आत्महत्यांचे सत्र मंत्रालयात सुरू आहे. धर्मा पाटील या शेतकऱ्याने मंत्रालयात आत्महत्या केली. धर्मा आजोबांचे बारावे-तेरावे होत नाही तोच गुरुवारी हर्षल सुरेश रावते या पंचेचाळीस वर्षांच्या तरुणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली व मरण पत्करले. धर्मा पाटील व हर्षल रावतेच्या आत्महत्येची कारणे वेगळी आहेत. रावते हा तुरुंगातून रजेवर सुटलेला कैदी होता व त्यास जन्मठेपेची शिक्षा लागली होती. पण त्याने शेवटी जीवनाचा अंत करून घेण्यासाठी

गेल्या महिनाभरात किमान पाच-सहा लोकांनी मंत्रालयात घुसून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. मारुती धावरे या शेतकऱयाकडे मंत्रालयाच्या दारात कीटकनाशक सापडले म्हणून अटक केली. त्यालाही तेथे आत्महत्याच करायची होती. अविनाश शेटे या तरुणाने मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर अंगावर रॉकेल ओतून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव मिळत नाही या वैफल्यातून ज्ञानेश्वर साळवे या शेतकऱ्याने मंत्रालयातच आत्महत्येचा प्रयत्न केला. पिल्लई या मालाडच्या तरुणाने ‘एसआरए’ घर योजनेत फसगत झाली म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील मंत्रालयात या आत्महत्या म्हणजे सरकार निर्दय व नाकाम झाल्याचा पुरावा आहे काय? लोकोपयोगी कारभार तर दूर राहिला, मंत्रालयात सामान्य जनतेची दाद-फिर्याद, अन्याय किमान ऐकून घेण्याचीही संवेदनशीलता राहिलेली नाही. म्हणूनच जिवंत माणसे तेथे घुसून मरण पत्करीत आहेत का? राज्यातील कानाकोप-यात, घरोघरी अस्वस्थता आहे व पिचलेली माणसे आत्महत्या करीत आहेत. हे चित्र महाराष्ट्राला शोभणारे नाही. शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, बेरोजगार रस्त्यावर उतरले आहेत.

Previous articleराज ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा !
Next articleसातवे आखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन गोंदिया जिल्ह्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here