मंत्रालयाची सर्कस करण्याऐवजी लोकांचे प्रश्न सोडवा!

मंत्रालयाची सर्कस करण्याऐवजी लोकांचे प्रश्न सोडवा!

विखे पाटील

मुंबई : मंत्रालयातील वाढते आत्महत्येचे प्रयत्न रोखण्यासाठी पहिल्या मजल्यावर संरक्षक जाळ्या बसवून फारसा उपयोग होणार नाही. उलट जाळीवर उडी मारल्यास जीव जाणार नाही, फार तर हात-पाय तुटतील; पण आपल्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले जाईल,अशी भावना निर्माण झाल्यास अन्यायग्रस्त रोज मंत्रालयात उड्या मारू लागतील. त्यामुळे ही सर्कस करण्याऐवजी लोकांचे प्रश्न सोडविण्याचे सरकारने प्रामाणिक प्रयत्न करावेत,असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

नागपूर महानगर पालिकेच्या एका अन्यायग्रस्त कर्मचाऱ्याने नागपुरातील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान‘रामगिरी’समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. अशा आत्मघातकी पद्धतीने कोणीही आपल्यावरील अन्यायाविरूद्ध दाद मागू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पण सोबतच जनतेमध्ये इतकी टोकाची भावना का निर्माण होते, याचे सरकारने आत्मचिंतन करण्याची आवश्यकताही विरोधी पक्षनेत्यांनी विषद केली. ते म्हणाले की, सरकारकडून न्याय मिळत नाही म्हणून मंत्रालयात येऊन जीव देण्याचे दुर्दैवी लोण आता मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत येऊन थडकले आहे. मंत्रालयातून कोणी उडी घेऊन आत्महत्या करू नये म्हणून पहिल्या मजल्यावर संरक्षक जाळ्या उभारण्याचा सरकारचा विचार सुरू आहे. पण हा या घटनांवरील इलाज नाही. संरक्षक जाळी असल्याने जीव जाणार नाही, याची खात्री पटली तर आपल्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाखी लोक रोज मंत्रालयातून उड्या मारायला लागतील. त्यामुळे अशी सर्कस करून जनतेला कोलांटउड्या मारण्यास भाग पाडण्याऐवजी जनतेत आत्महत्या करण्याचा विचारच येणार नाही, अशा पद्धतीने सरकारने काम करावे, असेही विखे पाटील पुढे म्हणाले.

Previous articleऔरंगाबादमध्ये शहाच्या पकोडा सेंटरमध्ये धनंजय मुंडेनी तळली भजी
Next article” गोवा फेस्टीवल २०१८ ला” मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here