फेसबुकवरील कुबेर ग्रुपचा आदर्श ; दोन दिवसात ३ लाखाची मदत
मुंबई : फेसबुक हे आभासी जग असले तरी या माध्यमातून मोठे सामाजिक कार्य होऊ शकते हे फेसबुक वरील कुबेर या समूहाने एका सदस्याला अचानक आलेल्या आजाराच्या संकटात दोन दिवसात ३ लाख रुपये मदत करून दाखवून दिले आहे.
संतोष लहामगे या संगमनेर च्या युवकाने फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात काम करणारी महाराष्ट्रातील अनेक लोकं “कुबेर” नावाच्या ग्रुपवर एकत्र आनली. याच समूहाने अवघ्या दोन दिवसांत तब्बल “तीन लाखांची” मदत गोळा करून समूहातील जयेश नलावडे या सदस्याचा उपचाराकरीता तातडीने दिली आहे. त्यामुळे, अशा या जीवनदायी मदतीचं उदाहरण देऊन या “कुबेर” समूहाने आपल्या समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
आतापर्यंत आपल्या वाचण्यात आणि पाहण्यात समाज माध्यमाचा वापर शक्यतो अपप्रचार किंवा अशांतता पसरवण्यासाठी केला जातो असंच आलेले आहे परंतु, याच गोष्टींना पुसत टाकत कुबेर समूहाचे संस्थापक संतोष लहामगे यांनी या समाज माध्यमाचे महत्व पटवून दिले आहे.काही दिवसांपूर्वी जयेश नलावडे हा अचानक आजारी पडला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा आजार इतका वाढला की, त्याला अतिदक्षता विभागात केलं गेलं. जयेशच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याच्या उपचारासाठी पैसे कमी पडत असल्याची माहिती समूहाचालक संतोष लहामगे यांना लागली. त्यांनी जयेशला मदत करण्याचं आवाहन समूहातील सर्व सदस्यांना केलं. त्यांनंतर लगेचच समूह सदस्यांनी मदतीचा मानस ठेवत अगदी दोन दिवसात ३ लाख रुपये मदतनिधी म्हणून गोळा केला.
या कुबेर समूहामध्ये जवळपास दहा देशात विविध क्षेत्रात काम करणारी एकूण १ हजार ७०९ सदस्य असून, ते नेहमी सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असतात. यापूर्वीही अनेकांच्या मदतीला कुबेरकर धावून आलेले आहेत.त्यासोबत हा महाराष्ट्रातील असा फेसबुक समूह आहे ज्याचे आत्तापर्यंत “सहा संमेलन” पार पाडली आहेत. जलसंधारण कामात एक गाव दत्तक, फिरते वाचनालय, हेल्पलाइन, कलाकारांना व्यासपीठ, प्रकाशन संस्था, दिवाळी अंक असे अनेक उपक्रम राबवणा-या या ग्रुप ने शाळा सुरु करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
कुबेरकरांच्या मदतीचा हात हा जयेशसाठी जीवनदानच ठरला आहे. शनिवार, दिनांक १० फेब्रुवारी रोजी समूहाचे प्रमुख संतोष लहामगे यांनी जयेशच्या आईकडे पैसे सुपूर्द केले व त्यासोबतच कुबेर समूहाच्या कोणत्याही सदस्याच्या कसल्याही अडचणीला आम्ही एकत्र येऊन त्याला तोंड देऊ असा शद्ब संतोष लहामगे यांनी येताना दिला, त्यामुळे त्यांच्या या कुबेर समूहाचं आणि त्यांच्या अशा सामाजिक कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.