गारपिटीग्रस्तांसाठी केंद्राकडे २०० कोटींची मागणी करणार
मुंबई : राज्यात गेल्या चार दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. कालपर्यंत झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे आतापर्यंत साधारणता एक लाख ९० हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सुमारे १ हजार ८०० गावांचा त्यात समावेश आहे. पुढील दोन दिवसात पंचनाम्याबाबत अंतिम अहवाल अपेक्षित आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार मदत देण्यात घेण्यात आला आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाकडे २०० कोटी रुपयांची मदत देण्याबाबत विनंती करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
कृषिमंत्री यावेळी म्हणाले, शनिवार व रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे १६ जिल्ह्यातील ६१ तालुक्यातील १ हजार २७९ गावांमधील १ लाख २७ हजार ३२२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. मात्र दि. १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे ६ जिल्ह्यांमधील २० तालुक्यातील ५९५ गावांतील ६१ हजार ३६१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. बुलढाणा, नांदेड, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या भागात काल झालेल्या अवकाळी पाऊसाने झालेल्या नुकसानाचा पंचनाम्याबाबत अंतिम अहवाल पुढील दोन दिवसात प्राप्त होईल.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत चर्चा झाली. फळ व शेती पिकांच्या नुकसानासाठी भरपाई देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा अंतर्गत गारपिटीचा विकल्प दिला आहे अशा शेतकऱ्यांसाठी विमा योजनेतून रक्कम देण्यात येईल. मोसंबी व संत्रा पिकासाठी २३ हजार ३०९ रुपये प्रती हेक्टरी, केळीसाठी ४० हजार रुपये प्रती हेक्टरी, आंब्यासाठी ३६ हजार ७०० रुपये तर लिंबूसाठी २० हजार रुपये प्रती हेक्टरी मदत देण्यात येणार आहे.ज्या शेतकऱ्यांनी फळपीक विमा काढला नाही परंतु गारपिटीने त्यांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार प्रती हेक्टरी १८ हजार रुपयांच्या मर्यादेत मदत देण्यात येईल, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले. मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील गारपिटीमुळे नुकसान झालेल्या जिरायत पिकांसाठी (ज्वारी, मका, गहू, हरभरा,सूर्यफूल) प्रती हेक्टरी ६ हजार ८०० रुपये तर सिंचनाखालील जमीनीबाबत १३ हजार ५०० रुपये मदत देण्यात येईल. नुकसानीबाबत पंचनामे पूर्ण झाल्यावर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल.
सोमवारी झालेल्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील २३२ गावांमधील २० हजार १७७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे त्यात ७ तालुक्याचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील ३ तालुके, १०३ गावे , १० हजार २६० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ३ तालुक्यात ४० गावांमधील २ हजार १५० हेक्टरचे नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील ३ तालुक्यातील ८२ गावामध्ये १ हजार ७२५ हेक्टरचे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील २ तालुक्यांमधील १० गावातील १४० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील ९६ गावांमधील २१ हजार ९२५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील ३२ गावांमधील ४ हजार 984 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.