गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी ५० हजार मदत द्या
खा. अशोक चव्हाण
परभणी : गारपिटीमुळे राज्यभरातील शेतक-यांच्या पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने शेतक-यांना प्रतीहेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
परभणी येथे पत्रकारपरिषदेत बोलताना खा. चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले की, राज्याच्या विविध भागात झालेल्या गारपीटीमुळे दोन लाख हेक्टरवरील पीकं आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. या गारपिटीत सात जणांचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. गारपीट झाल्यावर ४८ तासांत पंचनामे करू असे सरकारने सांगितले पण ७२ तास उलटूनही अद्याप पंचनाम्याला सुरुवात नाही. नेमके किती शेतकरी मेल्यावर या सरकारला जाग येणार आहे? अशी संतप्त विचारणा त्यांनी सरकारला केली.
त्यानंतर परभणी येथे काँग्रेसच्या जिल्हास्तरीय शिबिराला मार्गदर्शन करताना खा. चव्हाण म्हणाले की, मोठं मोठी आश्वासने देऊन भाजपने केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळवली पण सत्तेत येऊन चार वर्ष झाली तरी निवडणूकीत दिलेले एकही आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही. सबका साथ सबका विकास अशा घोषणा देऊन मोदींनी सत्ता मिळवली मात्र सत्तेवर आल्यावर भाजपचे खासदार मुस्लीमांनी या देशात राहू नये असे म्हणतात तर केंद्रीय मंत्री संविधान बदलण्याची भाषा करित आहेत. देशातली लोकशाही मोडून हुकुमशाही आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याचाच भाग म्हणून देशातील महत्त्वाच्या संस्थावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांच्या नियुक्त्या करून संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून १३ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रालयात येऊन शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. आश्वासन देऊनही सरकारने शेतीमालाला हमीभाव दिला नाही आता निवडणुका समोर दिसायला लागल्याने मतांसाठी पुन्हा जुमलेबाजी सुरु करून हमीभावाचे आश्वासन देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घोषणा देणे आणि भाषणे करण्याशिवाय काहीच करत नाहीत. जनतेला आता सरकारवर विश्वास राहिला नसून केंद्रात आणि राज्यात सत्तापरिवर्तनासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी यावेळी बोलताना भाजप सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले की, देशात शाह-तानाशहांचे सरकार असून हे सरकार फक्त दोन-चार उद्योगपतींच्या हितासाठी काम करित आहे. या सरकारला सर्वसामान्यांचे काही देणे घेणे नाही, अमेरिकन कपंन्यांच्या फायद्यासाठी मोदींनी नोटाबंदी केली. नरेंद्र मोदी परदेशी शक्तींच्या इशा-यावर देशाचा कारभार चालवत असून त्यांना सत्तेवरून दूर केल्याशिवाय या देशातील सर्वसामान्यांचे गरिबांचे कष्टक-यांचे दलित अल्पसंख्याक आदिवासींचे अच्छे दिन येणार नाहीत, हा संदेश घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता जनतेपर्यंत जावे असे मोहन प्रकाश म्हणाले.