सरपंच हाच पंचायत राज व्यवस्थेच्या विकासाचा पाया

सरपंच हाच पंचायत राज व्यवस्थेच्या विकासाचा पाया

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : पायाभूत सुविधा, सामाजिक सुविधा आणि आर्थिक विकास हीच आदर्शग्राम विकासाची त्रिसूत्री आहे. पंचायत राज व्यवस्थेच्या विकासाचा सरपंच हाच पाया असून महात्मा गांधी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संकल्पनेतील आदर्श गाव घडविण्याचा सर्व सरपंचांनी संकल्प करावा. शासनाच्या योजनांचा लाभ घेवून २०१९ पर्यंत आपले गाव बेघरमुक्त करण्यासाठी सर्व सरपंचांनी संकल्प करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

आळंदी येथील धारीवाल सभागृहात सकाळ समुहाच्या माध्यमातून आयोजित सातव्या सरपंच महापरिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आमदार बाबुराव पाचर्णे, सकाळ समुहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, फोर्स मोटर्सचे अध्यक्ष प्रदीप घाडीवाल, सकाळ समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार, ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण, प्रमोदराजे भोसले आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सकाळ समूहाच्या माध्यमातून कृषी आणि ग्रामीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. गेल्या सात वर्षापासून सुरू असणारी सरपंच महा परिषद ही राज्यातील सरपंचांना प्रगल्भ बनविण्याची कार्यशाळा आहे. यामाध्यमातून ग्रामीण विकासाला चालना मिळणार आहे. महाराष्ट्रातील ४८ टक्के जनता ही शहरी भागात तर ५२ टक्के जनता ग्रामीण भागात राहते. मात्र महाराष्ट्राच्या विकासात ग्रामविकासाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे राज्याचा विकास करण्यासाठी ग्रामविकास आणि कृषी विकास हाच महत्वाचा मंत्र आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राबरोबरच ग्रामविकासावर सरकारचा मोठा भर आहे.

जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्यात जलसंधारणाचे काम झाल्याचे सांगत फडणवीस म्हणाले कोणत्याही योजनेत जेव्हा लोकसहभाग वाढतो, सरकारची योजना ही जनतेची होते त्यावेळीच खऱ्या अर्थाने राज्याच्या विकासाला चालना मिळते. जलयुक्त शिवार अभियान अशाच प्रकारे लोक चळवळ झाली आहे, त्याचा परिणाम राज्यभरात दिसत आहे. प्रत्येक गावांनी जल स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. वातावरणातील बदलामुळे शेतीवर मोठी संकटे येत आहेत. त्यासाठी आपल्याला वातावरणातील बदल समजून घ्यावे लागतील. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. त्याकडेही आपल्याला लक्ष द्यावे लागेल. प्रत्येक गावांनी घनकचरा व्यवस्थापन करण्याबरोबरच आपल्या गावातील जलस्त्रोत खराब होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे.

Previous articleभाजपची मस्ती उतरवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
Next articleमॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेतून ३५ लाख रोजगाराच्या संधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here