सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घ्या; सरकारचे अधिका-यांना आदेश
मुंबई : स्थानिक पातळीवर कामामध्ये होणा-या विलंबाने आपल्या समस्या मंत्रालयात घेवून येणा-यांची संख्या दररोज वाढत आहे.त्यातच मंत्रालयातील हर्षल रावते या तरूणाने उडी मारून आत्महत्या केल्याने आत्महत्यांची धास्ती घेतलेल्या सरकारने सर्वसामान्यांच्या तक्रारी त्वरीत निवारणाच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दर दिवशी प्राप्त झालेल्या संदर्भ आणि प्रकरणावर त्याच दिवशी निर्णय घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
राज्यात “झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल” कार्यपद्धतीचा अवलंब करा, असा आदेश आज सरकारने जारी केला आहे. यामध्ये कार्यपध्दतीचा स्तर ठरवून देण्यात आला आहे.मंडळ, तालुका, उपविभाग, जिल्हा, विभागीय आणि राज्यपातळीवर झिरो पेन्डन्सी संदर्भात कार्यपध्दती आखून देण्यात आली आहे.दर दिवशी प्राप्त झालेल्या संदर्भ आणि प्रकरणावर त्याच दिवशी निर्णय घेण्याची सूचना देण्यात आली आहे. आता सर्व सामन्यांच्या तक्रारी निवारणासाठी सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे. काही दिवसापूर्वी काहींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता तर धर्मा पाटील आणि हर्षल रावते यांना जीव गमवावा लागला होता.या आत्महत्यांच्या घटनेमुळे हैराण झालेल्या राज्य सरकारने अधिका-यांना आदेश देवून सामान्यांना भेटा, त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना सहकार्य करा, असा शासन निर्णय जारी करून अधिका-यांना आदेश दिले आहेत.