भारतातही तिहेरी तलाकवर बंदी घालणे आवश्यक

भारतातही तिहेरी तलाकवर बंदी घालणे आवश्यक

मुंबई : तिहेरी तलाकचा संबंध धर्माशी नसून ती एक कुप्रथा आहे. संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातच तिहेरी तलाकवर बंदी घालण्याचे विधेयक प्राधान्याने मंजूर केले जाईल. तिहेरी तलाकवर जगातील बहुतांश मुस्लिम देशांमध्ये बंदी असून भारतातही त्यावर बंदी घालणे आवश्यक आहे. असे मत केंद्रीय अल्पसंख्यांक विकासमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र अल्पसंख्यांक मोर्चातर्फे राज्यभरातील मुस्लिम महिलांसाठी आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर केंद्रीय अल्पसंख्यांक विकासमंत्री नक्वी बोलत होते. यावेळी अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी, मीरा भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता, अल्पसंख्यांक मोर्चा सरचिटणीस सिकंदर शेख व ऐजाज देशमुख, मोर्चाच्या महिला प्रमुख रिदा रशिद, भाजपा मुंबई उपाध्यक्ष हैदर आझम व डॉ. नाहिदा शेख उपस्थित होते.समाजाचा प्रत्येक घटक विकासाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आग्रह आहे. मोदी सरकारने अल्पसंख्यांक समाजासाठी अर्थसंकल्पात भरघोस वाढ केली असून सरकारच्या योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ होण्यासाठी अल्पसंख्यांक समाजाला त्याची माहिती देण्याचे काम मुस्लिम महिला कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहनही मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले.

नक्वी यांनी सांगितले की, काही राजकीय शक्तींना वाटते की मुस्लिम समाज मागासलेला रहावा व सतत भितीच्या छायेत रहावा जेणेकरून त्यांची मते मिळवता येतील. पण मोदी सरकारने तुष्टीकरणाशिवाय सशक्तीकरण या धोरणानुसार अल्पसंख्यांकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात अल्पसंख्यांक विभागासाठी स्वातंत्र्यानंतरची सर्वाधिक सुमारे पाच हजार कोटींची तरतूद केली आहे.महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकारही अल्पसंख्य समाजासाठी काम करत आहे.अर्थसंकल्पातील वाढीव निधी अल्पसंख्य समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सशक्तीकरणासाठी उपयोगी पडेल. गेल्या तीन वर्षांत अल्पसंख्य समाजातील दोन कोटी ४५ लाख विद्यार्थी विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती दिली आहे. यंदा दीड कोटीपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. अल्पसंख्य समाजातील विद्यार्थी आयएएस व्हावेत यासाठीच्या प्रयत्नांना यश आले आहे.अल्पसंख्य समाजाचे शिक्षण व रोजगार यावर सरकारचा भर असल्याचेही त्यांनी सांगितले.

Previous articleभारतीय संगीताला जागतिक पातळीवर पोहोचविण्यात आशा भोसले यांचे मोलाचे योगदान
Next articleधोम , कण्हेर प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी देणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here