पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौ-यावर
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी एक दिवसाच्या मुंबई दौ-यावर येत असून, मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेचे उदघाटन आणि नवी मुंबई विमानतळाचे भूमिपुजन त्यांच्या हस्ते होणार आहे.
मुंबईच्या एक दिवसाच्या दौ-यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्या रविवारी दुपारी विशेष विमानाने मुंबईत आगमन होत असून, दुपारी ३ वाजता नवी मुंबई येथिल एम.एम.आर.डी.एच्या मैदानावर त्यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भुमिपूजन सोहळा पार पडेल. बांद्रा कुर्ला काॅप्लेक्स येथे ५:४५ वाजता मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेचे उदघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर होणा-या विविध कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स येथे रविवारी होणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन -२०१८ च्या पूर्व तयारीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली.यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त यु.पी.एस. मदान, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी,पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, सहआयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हीआयपी कॉन्फरन्स रूम, बैठक व्यवस्था, स्टेज, सुरक्षा याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेऊन सूचना केल्या. शिवाय मुख्यमंत्र्यांनी विविध उद्योगांच्या स्टॉलला भेटी देऊन तयारीबाबत माहिती घेतली. याठिकाणी माध्यमांसाठी मीडिया सेंटरची सोय करण्यात आली आहे.