महाराष्ट्राची ट्रिलीयन डॉलर इकॉनॉमीकडे वाटचाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान
मुंबई : महाराष्ट्र राज्य देशातील पहिले ट्रिलीयन डॉलर इकॉनॉमीकडे वाटचाल करणारे राज्य असून, देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले .
ते आज बिकेसी मैदानावर आयोजीत ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’जागतिक गुंतवणूक दारांच्या शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. नरेंद्र मोदी म्हणाले की, फडणवीस सरकारच्या सुधारणावादी धोरणांमुळे उद्योग क्षेत्राला एक नवी झळाळी प्राप्त झाली आहे. उद्योंगामुळे परिवर्तन आलेले आहे. गेल्या तीन वर्षामध्ये केलेल्या अथक प्रयत्नांमुळे देशभर फाईव्ह ट्रिलीयन डॉलर इकॉनॉमीची चर्चा होऊ लागली आहे.
महाराष्ट्र सरकारने ट्रिलीयन डॉलर इकॉनॉमीचे उदिष्ट ठरविले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत हे सहज शक्य आहे. आज जो महाराष्ट्राचा विकास दिसतो आहे.तो देशाच्या सामर्थ्याचे प्रतिक आहे.पायाभूत क्षेत्र विकासात महाराष्ट्र राज्य अग्रेसर ठरले आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत पहिला क्रमांक पटकविला आहे. मानवी हस्तक्षेप कमी करुन तंत्रज्ञानाच्या आधारे जनतेसाठी द्यावयाच्या सोई सुविधा अधिक सोप्या करण्यासाठी केंद्र सरकारने काम सुरु केले आहे. त्यामुळे कामकाजात पारदर्शकता वाढून विश्वासर्हाता वाढणार आहे. सरकारने जवळपास १४ हजार निरुपयोगी कायदे रद्द करून काही नवे कायदे जनतेच्या कल्याणासाठी केले आहे.आर्थिक सुधारणा करण्याच्या दृष्टीने सरकारने अनेक बदल अर्थसंकल्पात करुन सर्वसामान्य व्यक्ती नजरेसमोर ठेवुन विश्वास साधण्याचे ध्येय निश्चित केले आहे.नव्या आर्थिक धोरणांचा लाभ दलित,मागासवर्गातील जनता आणि शेतकऱ्यांना होईल. सर्वांना घरे,शुध्द पाणी, मुबलक वीज, चांगले रस्ते,चांगल्या आरोग्याच्या सुविधा हे ध्येय गाठायचे आहे.आयुषमान भारत या योजनेत दहाकोटी कुटुंबांना आरोग्य विमा देण्याचे उद्दीष्ट आहे. ग्रामीण भागात वेलनेस सेंटर स्थापनाचा निर्धार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणांसाठी १ लाख कोटीची योजना आहे. मुद्रा योजनेतुन लाखो रुपयांचे कर्ज दिले आहे.म्हणूनच मेक इन इडिया हे धोरण शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्वपुर्ण आहे.असे सांगून त्यांनी मॅग्नेटीक महाराष्ट्र आर्थिक गुंतवणूक परिषदेला शुभेच्छा दिल्या.
सन २०१६ मध्ये आयोजित ‘मेक इन इंडिया’ या परिषदेत सुमारे आठ लाख कोटींचे सामंजस्य करार केले गेले होते,त्यापैकी४.९१ लाख कोटी गुंतवणूक आली असून,६१% करारांवर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे. ७० लाख कोटी रूपयांचे उत्पादनही सुरु झाले आहे. इतर करारही पुर्णत्त्वाच्या टप्प्यात आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात स्वागतपर भाषणात मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या एकुण प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. ते म्हणाले की, पुन्हा एकदा जगाला गुंतवणूकीसाठी साद घालत आहोत. प्रधानमंत्री यांनीच आम्हाला ईझ ऑफ डुईंगचा मंत्र दिला आहे. यात लिकॉन या सिंगापूरच्या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्य क्रमांक एकवर आहे. थेट परकीय गुंतवणकीत मोठी वाढ झाली आहे. ही वाढ तीनशे टक्क्यांनी वाढली आहे. भारतात येणाऱ्या गुंतवणूकीपैकी पन्नास टक्के महाराष्ट्रात आली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, देशाने फाईव्ह ट्रीलीयन इकॉनॉमीचे उद्दीष्ट ठेवले आहे तर राज्याने २०२५ पर्यंत ट्रीलीयन डॅालर इकॅानॅामीचे ध्येय गाठण्याचे निश्चित केले आहे. यासाठी पाच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. यात सर्वप्रथम तंत्रज्ञान आधारित सेवांवर भर देण्यात येणार आहे. या दृष्टिने कार्यवाही सुरू झालेली आहे. दुसरा मुद्दा हा राज्यातील कौशल्य विकासावर भर देणे हा आहे. कृषीक्षेत्रातील लोकांना उतर कौशल्य विकसीत करुन रोजगार निर्मीती करण्यात येणार आहे.
राज्याने देशात सर्वप्रथम फिनटेक पॅालीसी तयार केली आहे. ३०० नवे स्टार्टअप्स या क्षेत्रात सुरू झाले आहेत. इंट्रीग्रेटेड इंडस्ट्रीज एरिया ही नवसंकल्पनेवर आधारित असणार आहे.राज्याने सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढविली आहे.एका अहवालानुसार महाराष्ट्रातील मोठ्या प्रकल्पातील गुंतवणूक मोठ्या वेगाने वाढते आहे. निती आयोगानेही महाराष्ट्राला पायाभूत सुविधांच्या विकासात अग्रेसर ठरविले आहे.यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून महाराष्ट्र समृद्धी कॅारिडॅार या द्वारे महाराष्ट्रातील चौदा जिल्हे जोडले जाणार आहेत. मुख्यमंत्री यांनी ‘सब का साथ सबका विकास’ यामध्ये महाराष्ट्र देशाच्या ध्येयाशी आणि स्वप्नाशी एकरूप होऊन काम करेल अशी ग्वाही दिली आणि देशाच्या विकासात सहयोग देण्याचे आवाहनही उपस्थित उद्योजक आणि व्यावसायीकांना त्यांनी केले.










