कार्यकर्त्याला हात लावाल तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे

कार्यकर्त्याला हात लावाल तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे

खासदार सुप्रिया सुळेंनी दिला इशारा…

जळगाव : राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला हात लावाल तर याद राखा गाठ सुप्रिया सुळेशी आहे असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिसांना दिला.

जळगावमधील जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोलची अठरावी सभा मोठया जनसमुदायासमोर पार पडली. या सभेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी पोलिस चुकीच्या पध्दतीने वागत असल्याचे समजताच त्यांनी खडे बोल सुनावले.

खासदार सुप्रिया सुळे यांना सभेच्याठिकाणी पोलिस त्रास देत असल्याचे सांगण्यात आले.तोच धागा पकडत खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील पोलिसांविषयी मला आदर आहे.त्यांचे नाव अभिमानाने सांगत आहे. मी एक महिला आहे त्यामुळे पहिल्यांदा नम्रपणे सांगत आहे. नम्रपणे सांगून ऐकणार नसाल तर चंडीकेचा अवतार घेणारी देखील एक महिला होती. हे विसरू नका. तुम्ही मंत्र्यांच्या सांगण्यावरुन चुकीचे वागत असाल तर थांबवा अन्यथा याद राखा. मी इतकी आक्रमक होत नाही. परंतु जे ऐकलं त्यामुळेच ही भूमिका घेतली आहे असे स्पष्टीकरणही सुप्रिया सुळे यांनी दिले.

सत्तेची मस्ती कशी उतरवायची हे आम्हाला चांगले कळते त्यामुळे राष्ट्रवादीच्या नादाला लागू नका आज सुसंस्कृतपणे सांगत आहे असा सज्जड दमही सुळे यांनी दिला. जामनेरच्या सभेत पहिल्यांदाच ताई आक्रमकपणे बोलल्याने सभेचा माहोलच बदलून गेला.

राष्ट्रवादीची हल्लाबोल आजची हल्लाबोल सभा जामनेर मध्ये होती. यावेळी निघालेली रॅली ज्या भागातून गेली तिथल्या रस्त्यावरच्या स्ट्रिट लाईट बंद केल्या होत्या. कॅबिनेट मंत्र्यांचा हा मतदारसंघ आहे. त्यांनी रस्त्यावर जरी अंधार केला तरी लोकांचा प्रचंड जोष, प्रतिसाद मात्र ते झाकू शकले नाहीत असा टोला त्यांनी लगावला.

मी आजवर काही चुकीचे काम केले नाही. त्यामुळे मला सुरक्षेची गरज लागत नाही. राष्ट्रवादीच्याही नेत्यांना कधीच रिव्हॉल्व्हर वैगरे घेवून फिरण्याची गरज भासली नाही असा शालजोडीतील टोला पालकमंत्र्यांना लगावला. आर. आर. पाटील यांनी पोलीस दलाला महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. अनेक ग्रामीण भागातील युवक व मोठया प्रमाणावर युवती देखील पोलीस दलात रुजू झाल्या होत्या. आर. आर. आबा असताना पोलीस खाते या पद्धतीने कधीच काम करत नव्हते असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस विरोधात असताना म्हणायचे आघाडी सरकारवर ३०२ दाखल केला पाहीजे. मी आज त्यांना प्रश्न विचारते, ‘धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली, तर ३०२ चा गुन्हा कुणावर दाखल करायचा? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्यावर की उद्धव ठाकरेवर? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 

Previous articleशरद पवारांची जामनेरच्या सभेत व्हर्च्युअल हजेरी
Next articleहार्दिक पटेल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here