अस्मिता योजनेमुळे बचतगटांना मिळणार रोजगार

अस्मिता योजनेमुळे बचतगटांना मिळणार रोजगार

महिला बचतगटाच्या दख्खन जत्रेचे ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते पुण्यात थाटात उद्घाटन

पुणे : मंत्रिपदाचा पदभार घेतल्यानंतर मुलींचा जन्मदर वाढविण्यावर भर दिल्यामुळे राज्यातील स्त्री-पुरूष प्रमाणातील असमतोल सध्या कमी झाला आहे. महिला व मुलींसाठी अनेक योजना सरकारने सुरू केल्या आहेत असे सांगत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी मुलगीच खरा वंशाचा दिवा असते असे प्रतिपादन आज येथे केले. दरम्यान, अस्मिता योजनेमुळे बचतगटांना रोजगार मिळणार असल्याचे त्या म्हणाल्या.

पुणे विभागातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विभागस्तरीय दख्खन जत्रेचे आणिजिल्हास्तरीय सावित्री महोत्सवाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले.त्यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना ना. पंकजाताई मुंडे बोलत होत्या. यावेळी जि. प.अध्यक्ष विश्‍वास देवकाते, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, आ. माधुरी मिसाळ, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, शिवसेनेच्या जिल्हा परिषदेतील गटनेत्या आशा बुचके आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलतांना पंकजाताई   मुंडे म्हणाल्या, मी बीडसारख्या मागास जिल्ह्यातील आहे. ऊसतोड कामगार आणि मजुरांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. याव्यतिरिक्त दर हजारी पुरुषांमागे सर्वांत कमी महिलांची संख्या असणारा जिल्हा म्हणूनही या जिल्ह्याची नवी ओळख निर्माण झाली होती. मात्र ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्रिपदाचा पदभार घेतल्यानंतर मुलींचा जन्मदर वाढविण्यावर भर दिला. त्यामुळे सध्या राज्यातील स्त्री-पुरुष प्रमाणातील असमतोल कमी झाला आहे. यासाठी महिला व मुलींसाठी अनेक योजना सुरू केल्या. त्यात प्रामुख्याने भाग्यश्री कन्या योजना, बचत गटांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज आदींचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.”

राज्यातील महिला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम व्हाव्यात, यासाठीच सत्तेवर आल्याबरोबर बचत गटांनी देण्यात येत असलेल्या कर्जाचा व्याजदर शून्य केला. त्याआधी बचत गटांना बारा टक्के व्याजदर आकारला जात असे. त्यापैकी पाच टक्के हिस्सा केंद्र सरकार देत असे. परंतु उर्वरित सात टक्के व्याज भरावे लागत असे. हा व्याजदर महिलांना पेलवणारा नव्हता. त्यासाठीच तो शून्य करण्यात आला. याचा राज्यातील सुमारे तीन लाख बचत गटांना लाभ झाला आहे. एकट्या पुणे विभागातील बचत गटांना सुमारे ३० कोटी रुपयांचे कर्ज वितरण

करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बचतगटांना रोजगार

मुख्यमंत्री रस्ते विकास योजनेतून तयार करण्यात येत असलेल्या रस्त्यांचा दर्जा चांगला राहावा, यासाठी रस्त्यांच्या कामांत प्लॅस्टिकचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लागणारे प्लॅस्टिक निर्मितीचे काम महिला बचत गटांकडे सोपविण्यात येणार आहे. शिवाय राज्यातील महिला आणि मुलींसाठी केवळ पाच रुपयांत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी “अस्मिता’ या ब्रॅंडनेमने हे सॅनिटरी पॅड तयार करण्यात येणार

आहेत. याचे वितरणही बचत गटांकडे सोपविण्यात येणार असल्याने बचतगटांना रोजगार मिळणार असल्याचे ना. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी सांगितले.

पाच हजार महिलांचा सहभाग

या प्रदर्शनात पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या पाच जिल्ह्यांचा समावेश असून यामध्ये पाच हजार महिलांचा सहभाग आहे. बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे २४५ स्टॉल, १८१ वस्तू तर खाद्य पदार्थांचे ४४ स्टॉल लावण्यात आलेले आहेत. पुणेकरांनी सहकुटुंब या दख्खनच्या यात्रेस भेट दयावी असेही आवाहन ना पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केले.

Previous articleरविकांत तुपकरांनी घेतली खा.छ. उदयनराजे भोसले यांची भेट
Next articleराज्य सरकारी कर्मचा-यांचा बेमुदत संपाचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here