मी नरेंद्र मोदींचा राजकीय गुरू नाही !

मी नरेंद्र मोदींचा राजकीय गुरू नाही !

शरद पवार

पुणे : मी शरद पवार यांची करंगळी पकडून राजकारणात आलो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असले तरी माझी करंगळी त्यांच्या हातात कधीही सापडली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला गुरूपण दिले, मात्र त्यामध्ये कसलाही अर्थ नसून, त्यांच्याशी माझा व्यक्तिगत सलोखा आहे. असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली त्यावेळी ते बोलत होते.

राज ठाकरे –  महाराष्ट्र नेहमीच देशाचा विचार करत आला असला तरी महाराष्ट्राचा विचार कधी झाला नाही. इतर राज्यांचे नेते असे करताना दिसत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यांना परदेशी पाहुण्यांना अहमदाबादला घेवून जातात ?

शरद पवार – अशामुळे  काही प्रमाणात झळ बसते हे खरे आहे . महाराष्ट्रासाठी देश हा नेहमीच मोठा राहिला आहे. देशाचे नेतृत्व करायचे असेल तर गुजरात आणि अहमदाबादचा अभिमान जरूर बाळगा. परंतु तुम्ही देशाचे नेते आहात हे लक्षात ठेवले पाहिजे.

राज ठाकरे – हे आपला शिष्य ऐकतो का?

शरद पवार–  मी देशाचा शेती खात्याचा मंत्री असताना नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री परिषदे वेळी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर वैयक्तिक हल्ला चढवायचे. त्यांचा हा स्वभाव कोणालाही पटायचा नाही. गुजरात हा भारताचा भाग आहे ही माझी भूमिका असायची. मी शरद पवार यांची करंगळी धरून राजकारणात आलो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात मात्र त्यांच्या हातात माझी करंगळी कधीही सापडली नाही. त्यांनी मला गुरूपण दिले यामध्ये कसलाही अर्थ नाही.

राज ठाकरेः खरे बोलल्यामुळे कधी त्रास होतो का?

शरद पवार–  राजकारण करत असताना खरे बोलणे हे गरजेचे असते मात्र अडचणीचे असेल त्याठिकाणी खरे न बोलणे बरे असते. समाज किंवा व्यक्तीचे मन दुखवायचे नसेल तर कुठे थांबायचं हे कळायला पाहिजे.

राज ठाकरे-  यशवंतराव चव्हाण यांच्या वेळेचे राजकारण सध्या दिसत नाही ?

शरद पवार – मी  लालबहाद्दूर शास्त्री यांना बघितले आहे. यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री होते. ते राज्यातील तरुणांचे आदर्श होते. समाजकारण, राजकारण आदी क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. त्यांचे संस्कारच असे होत गेले की आपण एका चौकटीबाहेर कधीही जाता कामा नये. संघर्ष जरूर झाला मात्र चौकट सोडली नाही. जवाहरलाल नेहरू यांनी देशासाठी काहीच केले नाही, हे पटणारे नाही.

राज ठाकरे– आपण  काँग्रेस-समाजवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे पक्ष बदलताना मनात काय असायचं?

शरद पवार – माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात काँग्रेसमधून झाली असल्याने मी नेहरू-गांधींची विचारधारा कधीही सोडली नाही. मतभेदामुळे काँग्रेस पक्ष सोडावा लागला. सुशिलकुमार शिंदे यांनी माझ्या बरोबरच काँग्रेस पक्ष सोडला. त्यांनी पंढरपूरच्या विठोबा सारखे पाठीशी राहण्याचे वचन दिले होते.मात्र निवडणुकांनंतर शिंदे परत काँग्रेसमध्ये गेले.

राज ठाकरे –  बाबरी मशिद पडल्यानंतर तुम्हाला मुंबईला पाठवण्यात आले. नरसिंहराव आणि तुमच्यात नक्की काय झाले ?

शरद पवार- मुंबई पेटली असल्याने संपूर्ण  जगाच लक्ष आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे लागले होते. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेची बाब निर्माण झाली होती. त्यामुळेच मला राज्यात मुख्यमंत्री म्हणून पाठविण्यात आले.तसा आग्रह त्यावेळचे पंतप्रधान नरसिंहराव यांनी धरला होता.

राज ठाकरे–   बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस आणि तुम्ही शिवाजी पार्कमध्ये एकत्र आला होता ?

शरद पवार–   बाळासाहेब आणि माझे संबंध चांगले होते तसेच तसेच जॉर्ज फर्नांडिस यांच्या बरोबर होते. गिरणगाव बंद पडल्यास मुंबई थांबेल असे बाळासाहेबांनी सांगितले होतै. त्यामुळे या घटनेवेळी आम्ही कामगारांच्या प्रश्नांवर एकत्र आलो.

राज ठाकरे– प्रत्येक भाषणात हा महाराष्ट्र   शाहू व फुलेंचा आहे म्हणता मग शिवाजी महाराजांचा का म्हणत नाही ?

शरद पवार – महात्मा फुले ,  शाहु महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्राला एक केले. जात, पात, धर्म विसरून राज्याला एकत्र करणारे ते नेते होते. आजही या विचारांची गरज आहे. महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचाच आहे, त्याबद्दल कोणालाही शंका नाही.

राज ठाकरे- महाराष्ट्रात यापूर्वी गरिबी होती पण शेतकरी आत्महत्या करत नव्हते ?

शरद पवार- कर्जबाजारीपणा हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे मुख्य कारण आहे. आमच्या सरकारने ७१ हजार कोटी रूपयांची कर्जमाफी दिल्याने त्यावेळी आत्महत्येच प्रमाण घटले होते. शेतक-यांच्या मालाला भाव दिला तरच परिस्थिती बदलेल.

राज ठाकरे–  विदर्भातील तीन मुख्यमंत्री झाले असतानाही वेगळ्या विदर्भाची मागणी का होते ?

शरद पवार –  वेगळ्या विदर्भाची मागणी ही केवळ चार जिल्ह्यांपुरतीच होती. सामान्य मराठी माणूस वेगळ्या विदर्भाच्या बाजूने नाही.

राज ठाकरे–  बुलेट ट्रेन सुरू करून मुंबई तोडण्याचा भाजपा सरकारचा डाव आहे का ?

शरद पवार– बुलेट ट्रेनमुळे मुंबईची गर्दी वाढणार आहे. मुंबईतून अहमदाबादमध्ये कोणी जाणार नाही, पण लोक तेथून मुंबईत येतील. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही.

राज ठाकरे – मोदी यांच्या बद्दल तुमचे आधी आणि आता नक्की मत काय आहे ?

शरद पवार- नरेंद्र मोदी यांच्यामध्ये कष्ट करण्याची जिद्द असली तरी देश चालवणे आणि राज्य चालवणे यामध्ये फरक आहे. देश चालवण्यासाठी मोदींकडे टीमचा अभाव आहे.

Previous articleराज्य सरकारी कर्मचा-यांचा बेमुदत संपाचा इशारा
Next articleसेना-भाजपमधील भांडण म्हणजे बंटी बबलीचा खेळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here