कायदा सुव्यवस्थेवरून मुख्यमंत्र्यांना घेरण्याची विरोधकांची रणनीती

कायदा सुव्यवस्थेवरून मुख्यमंत्र्यांना घेरण्याची विरोधकांची रणनीती

विरोधकांच्या भात्यात अनेक मुद्दे अधिवेशन वादळी ठरणार

मुंबई : काॅग्रेस राष्ट्रवादी पक्षाची झालेली जवळीक , शिवसेना आणि भाजपमधिल वाढलेला दुरावा, शेतक-यांची कर्जमाफी, मंत्रालयातील आत्महत्या सत्र, गारपीट, माहिती आणि तंत्रज्ञान विभागात झालेला घोळ, धुळे येथिल शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणी पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांच्यावर झालेले आरोप या पार्श्वभूमीवर सोमवारपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. आगामी निवडणूकीसाठी काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसची दिलजमाई झाली असतानाच शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्याने काॅग्रेस, राष्ट्रवादी काॅग्रेस आणि शिवसेना विविध मुद्यावर भाजपला या अधिवेशनात घेरण्याची चर्चा आहे. धर्मा पाटील आत्महत्येप्रकरणी पर्यटनमंत्री यांच्यावर झालेले आरोप, कर्जमाफीमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून झालेला घोळ यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्र्यांना विरोधीपक्ष लक्ष्य करण्याची शक्यता आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदेवरूनही विरोधक सरकारला कोंडीत पकडण्या प्रयत्न करू शकतात. एकीकडे काॅग्रेस , राष्ट्रवादी काॅग्रेस आणि शिवसेनेचा मुकाबला करताना या अधिवेशन काळात भाजपला पक्षातीलच काहीच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अधिवेशनात गोंधळ घालण्याचा दिलेला इशारा या मुळे भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढू शकते.

हिवाळी अधिवेशनानंतर राष्ट्रवादी काॅग्रेसने मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात काढलेल्या हल्लाबोल यात्रेमुळे राष्ट्रवादीचे सदस्य शेतक-यांच्या विविध प्रश्नावरून सरकारला या अधिवेशनात धारेवर धरू शकते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे येत्या ९ मार्च रोजी २०१८-१९ चा राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील.धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांनी विषप्राशन करून आणि हर्षल रावते या तरूणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून केलेली आत्महत्या, कर्जमाफीची आकडेवारी, कर्जमाफीचे लाभार्थी , बोंडअळी आणि गारपीट नुकसानग्रस्तांना मदतीत झालेला विलंब, बेरोजगारी आदी मुद्दे विरोधकांच्या भात्यात आहेत तर धर्मा पाटील प्रकरणावरून पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांना विरोधक लक्ष्य करतील.

राज्यात महिलांवर झालेल्या आत्याचाराचा मुद्दा, भीमा कोरेगाव येथे झालेली दंगल त्यानंतर महाराष्ट्र बंद वेळी झालेला हिंसाचार , संभाजी भिडे- मिलिंद एकबोटे यांच्याबाबत सरकारची भूमिका, राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती यावरून विरोधक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याची शक्यता आहे. राज्यातील काही शाळाबंद करण्याचा घेतलेला निर्णय यासह शिक्षकांच्या वेतनावरून उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय या मुद्द्यांवरून विरोधक शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना कोंडीत पकण्याची शक्यता आहे. मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्ती वाटपात झालेल्या घोळामुळे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागेल.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधीमंडळ समन्वय समितीची बैठक गेल्या आठवड्यात विधानभवनातील काँग्रेस विधीमंडळ पक्ष कार्यालयात झाली. राज्यातील ज्वलंत समस्या, अधिवेशनातील संभाव्य मुद्दे व चर्चेचा प्राधान्यक्रम, तसेच विविध आघाड्यांवर सरकारचे अपयश आदींबाबतही याबैठकीत विचारविनिमय करण्यात आला.फसवी कर्जमाफी, बोंडअळी व तुडतुड्यामुळे झालेल्या नुकसानाची अद्याप भरपाई न मिळणे, हमीभाव, नुकतीच झालेली गारपीट, मुंबई व राज्याच्या अन्य शहरी भागातील वाढत्या समस्या, भ्रष्टाचार, शिक्षण, बेरोजगारी, सरकारकडून सातत्यान होणारे इव्हेंट आदींसह इतर अनेक विषय या अधिवेशनात लावून धरण्याच्या सूचना या बैठकीत मांडण्यात होत्या. उद्या रविवारी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी सर्व विरोधी पक्षातील गटनेत्यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक होणार असून, त्यामध्ये सरकारविरोधातील रणनितीवर अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल. सध्याची परिस्थिती पाहता विरोधक मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकू शकतात. तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांसाठी उद्या रविवारी सह्याद्री अतिथीगृहावर चहापानासाठी निमंत्रित केले आहे. या अधिवेशनादरम्यान विविध मुद्दे विरोधकांकडे असल्याने सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे.

Previous articleराज्यसभेसाठी येत्या २३ मार्च रोजी मतदान
Next articleराज्यमंत्री सदाभाऊ खोतांच्या गाडीवर “स्वाभिमानी” हल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here